शासकीय कामात अडथळा केल्याप्रकरणी माजी नगरसेविकेला घेतले ताब्यात

0

स्टेशन परिसरातील अतिक्रमणांवर नगरपरिषदेचा हातोडा

कारवाई दरम्यान चौकाला छावणीचे आले स्वरूप

तळेगाव दाभाडे : तळेगाव दाभाडे येथील रेल्वे स्टेशन परिसरातील यशवंतनगर ते शिवाजी चौक हद्दीतील 50 पेक्षा अधिक अतिक्रमण दुकाने गुरुवारी जमीनदोस्त करून चौकाचा श्‍वास मोकळा केला. कारवाई दरम्यान चौकाला छावणीचे स्वरूप आले होते. पोलिसांनी एका माजी नगरसेविकेसह पाचजणांना ताब्यात घेतले. अतिक्रमण काढलेल्या जागेवर रस्ता रुंदी तसेच वाहनतळ उभारण्यात येणार आहे. मागील काही वर्षांपासून यशवंतनगर ते शिवाजी चौक हद्दीत अनधिकृतपणे बांधकाम मो÷ठ्या प्रमाणात झाले आहे. टपरी, हॉटेल्स, दुकाने, कार्यालय बांधून नागरिकांनी अतिक्रमण केले आहे. त्यामुळे यशवंतनगर ते शिवाजी चौकात कायमच वाहतूक कोंडी होत होती. त्यातच रेल्वेने प्रवास करणार्‍या नागरिकांना या चौकातून जीव मुठीत घेऊन ये-जा करावी लागत होती. काहींना या वाहतूक कोंडीमुळे वेळेत रेल्वे स्टेशनवर पोहोचता येत नसल्याने त्यांचा वेळ व पैसा व्यर्थ जात होता. या चौकात मोठ्या प्रमाणावर अवैध धंद्यांचा अड्डा होता.

सशस्त्र पोलीस दलाची उपस्थिती

तळेगाव दाभाडे नगरपरिषेदेने अतिक्रमण कारवाई केली आहे. त्यामुळे या चौकाने मोकळा श्‍वास घेतल्याने नागरिकांनी नगरपरिषदेचे आभार मानले. अतिक्रमण केलेल्यांना नगरपरिषदेकडून सलग चारवेळा अतिक्रमण काढून घेण्याच्या लेखी सूचना दिल्या होत्या. त्यावर नागरिकांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही. कोणीही अतिक्रमण स्वतःहून काढले नाही. त्यामुळे गुरुवारी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी वैभव आवारे, सहाय्यक पोलीस आयुक्त गणपत माडगुळकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक भानुदास जाधव, पोलीस निरीक्षक नारायण पवार, उप निरीक्षक कमलाकर भोसले, वैभव सोनावणे, शरद पाटील, अमित भोसले, मयूर मिसाळ, रवि काळोखे यांच्यासह एकूण 59 सशस्त्र पोलीस दलाच्या उपस्थितीत अतिक्रमण कारवाई सुरु करण्यात आली. अत्याधुनिक क्रेन, जेसीबी यंत्र, ट्रॅक्टर व डंपर यांचा उपयोग अतिक्रमणे जमीनदोस्त करण्यासाठी वापर करण्यात आला.

मुख्याधिकारी नाही ‘सिंघम’

नगर परिषदेतील बांधकाम, आरोग्य, अतिक्रमण आदी विभागातील सर्वच कर्मचारी सक्रियपणे अतिक्रमण काढत होते. तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या हद्दीतील ही सर्वात मोठी अतिक्रमण कारवाई मुख्याधिकारी वैभव आवारे यांनी केल्याने त्यांची सिंघम अधिकारी अशी ओळख निर्माण झाली आहे. अतिक्रमण काढताना नगरपरिषद अधिकारी व नागरिक यांच्यात शाब्दिक वाद झाले असता, सहाय्यक पोलीस आयुक्त गणपत माडगुळकर यांनी त्वरित वाद मिटवून अतिक्रमण कारवाई कायम सुरु ठेवली. तळेगाव दाभाडे मधील सर्वात मोठी अतिक्रमण कारवाई होत असल्याने बघ्यांची मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती. काही महिला अतिक्रमण कारवाई करताना विरोध करीत होत्या. त्यांनाही महिला पोलिसांनी शांत बसविले. गेल्या अनेक वर्षांपासून थाटलेली दुकाने डोळ्यादेखत तुटत असल्याने काही नागरिकांचे डोळे पाणावले होते. स्थानिक नगरसेवकांनी या अतिक्रमण कारवाईकडे पाठ फिरवली असल्याने ही अतिक्रमण कारवाई शांततेत करण्यात आली. रेल्वे पोलीस हवालदार संजय तोडमल म्हणाले की, ही अतिक्रमण कारवाई झाल्याने रेल्वे स्टेशन परिसर सुरक्षित झाला आहे. प्रवासी स्वतःला सुरक्षित मानत आहेत.

सर्वच अतिक्रमणांवर होणार कारवाई

मुख्याधिकारी वैभव आवारे म्हणाले की, यशवंतनगर ते शिवाजी चौकात मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण झाल्याने चौक व रस्ता अरुंद झाला होता. त्यातच दुतर्फा दुचाकी व चारचाकी वाहने उभी केलेली असतात. त्यामुळे रेल्वे स्टेशनकडे ये-जा करणार्‍या नागरिकांना मार्ग काढताना कसरत करावी लागत होती. अतिक्रमण केलेल्यांना सलग चारवेळा लेखी सूचना दिल्या. त्यांनी अतिक्रमणे काढत नसल्याने प्रशासनाने पुढाकार घेवून अतिक्रमण कारवाई सुरु केली. त्या जागेवर रस्ता रुंदीकरण तसेच वाहनतळ सुरु करण्यात येणार आहे. नगरपरिषद हद्दीतील सर्वच अतिक्रमणावर कारवाई करण्यात येणार आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक भानुदास जाधव म्हणाले की, तळेगाव दाभाडे शहरातील चौकाचौकातील झालेले अतिक्रमण काढण्यात येणार आहे. हद्दीतील अवैध धंद्यांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे. तसेच परिसरातील सीसीटीव्हीचे कॅमेरे सुरु असल्याची तपासणी करण्यात येणार आहे. भाडेकरुंची माहिती पोलीस स्टेशनमध्ये न देणार्‍यांवर गुन्हे दाखल करणार आहे.