शासकीय कामात अडथळा: कैलास सोनवणेंविरुध्द गुन्हा

0

उपायुक्तांना शिवीगाळ; एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल

जळगाव: शासकीय कामात अडथळा आणून शिवीगाळ केल्याप्रकरणी तसेच मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी मनपा उपायुक्त मिनिनाथ दंडवते यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन नगरसेवक कैलास सोनवणे यांच्या विरुध्द एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मनपा उपायुक्त मिनिनाथ दंडवते यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, दिनांक 16 मार्च रोजी रात्री नऊ ते सव्वा नऊ वाजेच्या सुमारास मनपाचे स्वीकृत नगरसेवक कैलास सोनवणे यांनी मला मोबाईलवर फोन केला. यावेळी त्यांनी साफसफाईचे काम करणारी वॉटरग्रेस कंपनी ही उद्या काम सुरू करत आहे, अगर कसे? याबाबत मला विचारले. यावर मी त्यांना कंपनीचा मनपा कर्मचार्‍यांकडे काम सुरू करण्याबाबत निरोप आल्याबाबत सांगितले. तेव्हा त्यांनी ते उद्या टीबी सॅनीटोरीयममध्ये असलेल्या मनपाचे वाहनतळ येथे येणार असून तुम्हीही तेथे येण्याबाबत सांगितले. त्यावर मी त्यांना होकार दिला. त्यानंतर वॉटरग्रेस कंपनीच्या काम सुरू करण्याबाबतच्या निरोपासंदर्भात मी आयुक्त सतीश कुलकर्णी यांच्याशी रात्री दहा वाजता दूरध्वनीवरून चर्चा केली. त्यांनी मला पुरेशी यंत्रणा असल्यास काम सुरू करण्याबाबत निर्णय घ्यावा, अशी सूचना केली होती.

मनपा वाहनतळ येथे मी उभा असतांना कैलास सोनवणे हे माझ्याशी मोठ्या आवाजात बोलून ’ तुला मी बघूनच घेतो,तुला अजून मी मारले नाही,पण ठरवलं तर नक्कीच मारेल अशी धमकी देवून माझ्या पत्नीबाबत अश्‍लील बोलले. मी त्यांना वाईट शब्द वापरू नका, असे सांगितले. परंतू त्यांनी मला उद्देशून सार्वजनिक ठिकाणी, कामाच्या ठिकाणी, अशी शिवीगाळ करून सरकारी कामात अटकाव केल्याचे उपायुक्त दंडवते यांनी फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात नगरसेवक कैलास सोनवणे यांच्याविरुध्द कलम 294,500,506,186 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.