शासकीय कार्यालयात सॅनिटरी नॅपकिनसाठी वेंडिंग मशीन बसवावी

0

नवी मुंबई । पनवेल महानगरपालिकेत आज मोठ्या प्रमाणात महिला वर्ग काम करीत असून त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यातच महिलांसाठी मोठी अडचण मासिक पाळीची आहे. काम करत असताना कोणत्याही प्रसंगी त्यांना लगेच सॅनिटरी नॅपकीन मिळावेत व त्यांची अडचण होऊ नये म्हणून राष्ट्रीय महिला आयोगाने सार्वजनिक जीवनात वावरणार्‍या महिलांसाठी योग्य पावले उचलली आहेत.

राष्ट्रीय महिला आयोगाने शाळा व महाविद्यालये तसेच सार्वजनिक ठिकाणी सॅनिटरी नॅपकिनसाठी वेन्डींग मशीन बसविण्याची सूचना राज्य सरकारला केली आहे. या आदेशानुसारच पनवेल तालुक्यातील शासकीय कार्यालयात सॅनिटरी नॅपकिनसाठी वेंडिंग मशीन लवकरात लवकर बसवावे. अशी मागणी आपला आधार फाउंडेशन संस्थेतर्फे पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे, महापौर डॉ. कविता चौतमल, उपमहापौर चारुशीला घरत, पनवेल तहसील कार्यालय, परिमंडळ 2 चे उपायुक्त राजेंद्र माने व सहाय्यक पोलीस आयुक्त प्रकाश निलेवाड व पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.