शासकीय गोदामात निकृष्ट दर्जाचे धान्य : आमदारांकडून चौकशीची मागणी

जबाबदार महसूल यंत्रणेवर कारवाई करण्यासंदर्भात जिल्हाधिकार्‍यांसह अन्नपुरवठा मंत्र्यांकडे तक्रार

मुक्ताईनगर : मुक्ताईनगर तालुक्यातील शासकीय स्वस्त धान्य दुकानांमधून सामान्यांपर्यंत वाटप करण्यात येणारे भरडधान्य अतिशय निकृष्ट दर्जाचे वाटप होत असल्याची माहिती आमदार चंद्रकांत पाटील यांना कळताच त्यांनी शनिवारी थेट मुक्ताईनगरातील तसेच तालुक्यातील कुर्‍हा येथील शासकीय गोदामाला भेट देत पाहणी केली. दोन्ही गोदामात साठवून ठेवण्यात आलेले भरड धान्य काळे व सडलेल्या अवस्थेत म्हणजेच अतिशय निकृष्ट दर्जाचे आढळून येताच आमदारांनी आश्‍चर्य व्यक्त केले. डिसेंबर-जानेवारी महिन्यात शेतकी संघामार्फत खरेदी करण्यात आलेले भरडधान्य केवळ तीन महिन्यात धान्य इतके सडले कसे ? त्याला कीड लागण्याचे व काळे पडण्याचे नेमके कारण काय ? धान्याची अदला-बदल तर झाली ना ? अशी शंका आमदार चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली आहे.

दर्जा तपासून खरेदी मग नेमके ‘हे’ घडले कसे ?
शासनामार्फत झोपडीपर्यंत शेवटच्या माणसापर्यंत शासकीय स्वस्त धान्य दुकानामार्फत गहू, ज्वारी, तांदूळ स्वस्त भावात उपलब्ध करून देण्यात येते. हे धान्य खरेदी करत असताना त्याचा दर्जा चांगला आहे की नाही हे तपासूनच त्याची खरेदी केली जाते मात्र असे असताना शेतकी संघामार्फत शेतकर्‍यांकडून डिसेंबर ते जानेवारी महिन्यात म्हणजेच केवळ तीन महिन्यांपूर्वीच धान्य खरेदी करण्यात आले असताना इतक्या कमी कालावधीत ज्वारी व मका हे धान्य खराब झाले आहे. सतराशे क्विंटल ज्वारी व 986.50 क्विंटल मका खरेदी करण्यात आल्यानंतर सुमारे 70 ते 80 लाख रुपयांचे नुकसान शासनाचे झाले आहे.

तहसीलदारांनी नेमकी काय तपासणी केली?
दरम्यान, दर महिन्याला तहसीलदार या स्वस्त धान्य गोडाऊन ला भेट देत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे परंतु या ठिकाणी भेटी देऊन नेमके ते करतात काय? असा सवालही येथे उपस्थित होत आहे. धान्य तपासणी करण्याकरता तहसीलदार गोडाउनमध्ये येत असतात तरीसुद्धा गोदामात आलेल्या धान्याची तपासणी का झाली नाही जर धान्याची तपासणी केली असती तर तहसीलदार यांच्या निदर्शनात आले असते परंतु ही बाब तहसीलदारांच्या नजरेआड झालीच कशी शिवाय हेच निकृष्ट दर्जाचे धान्य की जे जनावरेसुद्धा खाऊ शकत नाही ते द्वारपोच योजनअंतर्गत गरीबांपर्यंत पोहोचवण्यात येत असल्याची बाब संतापजनक आहे. शासनाची बदनामी होईल, असा कोणताही प्रकार खपवून घेतला जाणार नसल्याचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

दोषींवर व्हावी कारवाई : आमदार
या प्रकाराची वरीष्ठ पातळीवरून चौकशी होऊन दोषींवर कारवाई करण्यात येणार असल्याचेही आमदारांनी सांगितले. यासंदर्भात आमदार यांच्यातर्फे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व जळगाव जिल्हाधिकारी तसेच अन्न व नागरी पुरवठा मंत्री यांच्याकडे तक्रार करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. यात विशेष बाब म्हणजे मुक्ताईनगर तसेच पुन्हा येथील दोन्ही गोदामात हजारो क्विंटल शासकीय स्वस्त धान्याची साठवणूक असतानाही तेथे सीसीटीव्ही नसल्याने तहसीलदार व गोदामपाल अशा महसूलयंत्रण तर्फे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचाराला खतपाणी घालण्याचा प्रकार होत असल्याचा आरोपही तालुक्यातील शेतकर्‍यांनी केला आहे.

यांची होती उपस्थिती
याप्रसंगी आमदारांसह तहसीलदार श्वेता संचेती, नगरसेवक मुकेश वानखेडे, नगरसेवक संतोष मराठे, शिवसेना तालुकाप्रमुख छोटू भोई, अफसर खान, गणेश टोंगे, रीतेश सोनार, स्वीय सहाय्यक प्रवीण चौधरी तसेच प्रशांत पाटील आदींची उपस्थिती होती.