शासकीय चतुर्थ श्रेणी कर्मचारी २७ सप्टेंबरपासून बेमुदत संपावर

1

मुख्यमंत्र्यांच्या उदासीनतेवर तीव्र नाराज; राज्यातील सर्व जिल्ह्यामधील तसेच मंत्रालयातील कामकाज होणार ठप्प

मुंबई । चतुर्थश्रेणी कर्मचारी वर्गाच्या मागण्या मान्य करण्याबाबतच्या मुख्यमंत्र्यांनी दाखविलेल्या उदासिनतेमुळे अखेर कर्मचारी वर्गाने दोन दिवसांचा संप केला. मात्र तरीही शासन कुठलीही कार्यवाही करत नसल्यामुळे व उलट संपावर गेल्यामुळे कारवाई करत असल्यामुळे संतप्त झालेल्या कर्मचारी वर्गाने आता बेमुदत संप तोडगा निघेपर्यंत करण्याचा निर्धार केला आहे. याबाबत महाराष्ट्र राज्य सरकारी चतुर्थश्रेणी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या राज्य कार्यकारिणीच्या आजच्या बैठकीत २७ सप्टेंबरपासून बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय संघटनेचे नेते भाऊसाहेब पठाण यांनी जाहीर केला आहे. त्यामुळे आता सर्व जिल्हयांमधील तसेच मंत्रालयातील कामकाज ठप्प होणार आहे.

कर्मचारी संघटनेच्या नेत्यांची बैठक
आजच्या या बैठकीस अध्यक्ष भाऊसाहेब पठाण व कार्याध्यक्ष भिकू साळुंखे, सरचिटणीस प्रकाश बने, आर. टी. सोनावणे, कुटुंब मंचाच्या अध्यक्ष सुवर्णा शेवाळे तसेच जिल्हा व तालुका समित्यांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांनी यापूर्वी मागण्या मान्य करण्याबाबत सकारात्मकता दाखविली होती. तत्वतः मान्यता दिली होती. त्यानंतर काहीच कारवाई केली नाही. त्याचबरोबर वारंवार निवेदने, विनंत्या करूनही प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे अखेर इशारा म्हणून संप करण्याचे जाहीर केला. दोन दिवसांचा संपदेखील केला. तरीही मुख्यमंत्री आपल्या निर्णयानुसार वागत नाहीत, शब्द पाळत नाहीत, म्हणून हे आंदोलन करावे लागत आहे, असे भाऊसाहेब पठाण यांनी म्हटले आहे.

ह्या आहेत प्रमुख मागण्या
अनुकंपा तत्वावरील सेवाभरती विनाअट करावी, वैद्यकीय दृष्ट्या अपात्र कर्मचार्‍यांच्या पाल्यास शासन सेवेत समाविष्ट करावे, चतुर्थश्रेणी कामगार निवृत्त झाल्यानंतर त्याच्या एका पाल्यास शासकीय सेवेत नोकरी मिळावी, सर्व खात्यातील चतुर्थ श्रेणी कर्मचार्‍यांची पदे तत्काळ भरावीत, या कर्मचार्‍यांना शासकीय वसाहत गृह खात्याप्रमाणे बांधून द्यावी, चतुर्थश्रेणीतून तृतीय श्रेणीत २५ ऐवजी ५० टक्के पदोन्नती करताना चतुर्थ श्रेणीची पदे निरसित करू नये.