शासकीय जागेवरील अतिक्रमण भोवले : कासवेतील दोन सदस्य अपात्र

यावल : तालुक्यातील कासवे ग्रामपंचायतीच्या जागेवर अतिक्रमण करीत बांधकाम करून रहिवास केल्याप्रकरणी लताबाई पंढरीनाथ सपकाळे आणि पवन पंढरीनाथ कोळी या दोन्ही ग्रामपंचायत सदस्यांना महसूल उपजिल्हाधिकारी शुभांगी भारदे यांनी अपात्र केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

अपात्रेबाबत दाखल होती तक्रार
कासवे, ता.यावल ग्रामपंचायतीच्या सदस्य लताबाई पंढरीनाथ सपकाळे आणि पवन पंढरीनाथ कोळी यांनी ग्रामपंचायतीच्या जागेवर अतिक्रमण करीत बांधकाम करून रहिवास सुरू केल्याची तक्रार विनोद श्रावण कोळी यांनी करीत उभयंतांना अपात्र करण्याची मागणी (ग्रा.पं.विवाद अर्ज क्र. 52/2021 नुसार ) जिल्हाधिकारी कार्यालयात केली होती.

तक्रारीत आढळले तथ्य
या तक्रार अर्जावरील सुनावणीअंती लताबाई पंढरीनाथ सपकाळे आणि पवन पंढरीनाथ कोळी यांनी ग्रामपंचायत जागेवर अतिक्रमण केल्याचे सुनावणीदरम्यान सिद्ध झाले. त्यानुसार लताबाई पंढरीनाथ सपकाळे आणि पवन पंढरीनाथ कोळी यांना कासवे ग्रामपंचायतीच्या सदस्य पदावर राहण्यास अपात्र असल्याचा निर्णय महसूल उपजिल्हाधिकारी भारदे यांनी दिल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.