भुसावळ। तालुक्यातील साकेगाव येथील ग्रामपंचायत सदस्यानेच शासकीय एका एकर जागेवर अतिक्रमण करत कपाशीचे पीक लावल्याची धक्कादायक माहिती उघड झाल्याने ग्रामस्थ संतप्त झाले आहे. सत्तेचा गैरवापर करत या सदस्याने अतिक्रमण केल्याचा आरोप गावातील ग्रामस्थांनी केला असून यासंदर्भात प्रभारी जिल्हा पुरवठा अधिकारी राहुल जाधव यांना निवेदन देण्यात आले.
आश्चर्यम् : अतिक्रमित जागेवर कपाशीची बाग
साकेगाव ग्रामपंचायतीच्या गट नंबर 271/अ/1 या ग्रामपंचायतच्या विहिरीला लागून असलेल्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहाजवळील तब्बल एका एकर जागेवर ग्रामपंचायत सदस्य माणिक भादू पाटील (कोळी) यांनी बेकायदेशिरपणे तारेचे वॉलकम्पाऊंड करत कपाशीची लागवड केली आहे. पाटील यांना अपात्र करावे अशी मागणी गावातील विजय सीताराम पाटील यांनी जळगाव जिल्हाधिकार्यांकडे केली आहे. शिवाय पाटील यांनी मालमत्ता कराचा भरणा नोटीस मिळाल्यानंतरही केला नसल्याचा आरोप आहे. निवेदन देतांना जिल्हा परिषद सदस्य रवींद्र नाना पाटील, माजी सरपंच अनील पाटील, तक्रारदार विजय सीताराम पाटील, उपसरपंच शकील पटेल, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक संतोष भोळे, ग्रामविकास पॅनलप्रमुख निवृत्ती पवार, ग्रामपंचायत सदस्य साबीर पटेल, अनंत सोनवणे, प्रविण पवार, सामाजिक कार्यकर्ते नारायण पाटील, प्रमोद पाटील आदींची उपस्थिती होती.