शासकीय डॉक्टरांना मिळणार स्वरक्षणाचे धडे

0

सोलापूर- धुळ्यात डॉक्टरला झालेल्या मारहाणीनंतर त्याचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रभर पसरले होते. त्यावेळी संपूर्ण महाराष्ट्रभर डॉक्टरांनी काम बंद आंदोलन केले होते. यामुळे अनेक रुग्णांना याचा त्रास सहन करावा लागला होता. परिणामी डॉक्टरांना संरक्षण मिळावे यासाठी सोलापूरात एक उपक्रम राबवण्यात येत आहे. राज्यातील विविध शासकीय महाविद्यालयांतील डॉक्टर, कर्मचारी व नर्सेस यांच्यावर हल्ले होतात. तणावपूर्ण स्थिती निर्माण होते. या पार्श्‍वभूमीवर कायदे करण्यासाठी पाठपुरावा केला जात असला तरी रुग्णालयातील डॉक्टर व कर्मचार्‍यांनाच स्वत:चे संरक्षण करता यावे, यासाठी कराटे व फिक्स्ड मार्शल आर्टसारखे प्रशिक्षण दिले जाणार आहे. सोलापूर जिल्हा रुग्णालयात या प्रशिक्षणाची महिनाभरात सुरुवात होईल.

वैद्यकीय शिक्षण संचालनालय यांनी वैद्यकीय महाविद्यालय व संलग्नित असलेल्या जिल्हा रुग्णालयांमध्ये सेल्फ डिफेन्सचे प्रशिक्षण द्यावे, असे वैद्यकीय शिक्षण संचालकाकडून अधिष्ठाता कार्यालयास पत्र प्राप्त झाले आहे. त्यानुसार डॉक्टरांना व वैद्यकीय कर्मचार्‍यांना स्व-रक्षणाचे धडे घेण्यासाठी बंधन नसेल. प्रशिक्षण इच्छेनुसार घेण्याची सोय या आदेशात आहे. वैद्यकीय शिक्षण विभागांतर्गत राज्यात 16 महाविद्यालये आहेत. त्या प्रत्येक महाविद्यालयास वैद्यकीय उपचारकर्ते डॉक्टर यांच्याकरिता मार्गदर्शक सूचना व सुरक्षेसंदर्भातील उपाययोजना कराव्यात, असे मुंबईच्या चैतन्य संस्थेने सुचवले होते. त्यानुसार शासनाने रुग्णालयातील कार्यरत अध्यापक, निवासी डॉक्टर, परिचारिका, परा वैद्यकीय कर्मचार्‍यांवरील हल्ल्यांच्या संदर्भात ठोस उपाययोजना करण्याचे निश्चित केले. निवृत्त पोलिस महासंचालक प्रवीण दीक्षित यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित केली. त्या समितीने राज्यातील जी वैद्यकीय महाविद्यालये डॉक्टर व इतर कर्मचारी यांना स्व-रक्षणाचे धडे देणार आहेत, त्यांचा अहवाल वैद्यकीय शिक्षण विभागाकडे पाठवावा, असे सांगण्यात आले आहे.

पहिला मान सोलापूरला
वैद्यकीय शिक्षण संचालनालयाकडून प्रत्येक वैद्यकीय महाविद्यालयांना डॉक्टर व इतर कर्मचारी यांच्या स्व-रक्षणाच्या संदर्भात योग्य त्या उपाययोजना कराव्यात, असे सांगितले आहे. त्यानुसार सिव्हिलमधील डॉक्टरांना कराटे अथवा मिक्स मार्शल आर्टचे प्रशिक्षण दिले जाईल. हे प्रशिक्षण करणे बंधनकारक नसून इच्छेनुसार करता येईल. त्याची प्रत्यक्षात सुरुवात महिनाभरात होणार असून प्रशिक्षण घेणारे सोलापूरचे रुग्णालय राज्यातील पहिले ठरेल.
डॉ. औदुंबर मस्के, वैद्यकीय अधीक्षक, सोलापूर