संस्थेतील 15 कर्मचार्यांच्या इतरत्र बदल्या; शासनाच्या आदेशानुसार पुढील कारवाई
पुणे : शासकीय दूरशिक्षण तंत्रनिकेतनचे डिप्लोमा अभ्यासक्रम 2013 साली बंद झाले असतानाही अद्याप ही संस्था सुरूच असून, कर्मचारी तसेच अधिकारी केवळ हजेरी लावण्याचे काम करत आहेत. तसेच ऑनड्युटी डुलक्या घेत असल्याचा प्रकार समोर आले आहेत. तंत्रशिक्षण संचालनालयाने एका आठवड्यातच संस्था बंद केली आहे. संस्थेतील 15 कर्मचार्यांच्या गुरुवारी बदल्या करण्यात आल्याची माहिती तंत्रशिक्षण संचालनालयाचे सहसंचालक डॉ. दिलीप नंदनवार यांनी दिली.
डॉ. नंदनवार म्हणाले, शासकीय दूरशिक्षण तंत्रनिकेतनमध्ये तृतीय श्रेणीचे 11 कर्मचारी आणि चतुर्थ श्रेणीचे 4 असे एकूण 15 कर्मचारी काम करत होते. यातील पाच कर्मचार्यांची पुणे शासकीय तंत्रनिकेतन या ठिकाणी बदली करण्यात आली आहे. तर उर्वरित 10 कर्मचार्यांपैकी काही कर्मचार्यांची विभागीय संचालक कार्यालय, कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये, तर काहींची राज्यातील इतर ठिकाणी बदली करण्यात आली आहे. यामध्ये मॅकेनिकल, इलेक्ट्रिकलचे प्राध्यापक, वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ लिपिक, सफाई कामगार, हमाल, आर्टिस्ट, कार्यालय अधिक्षक या पदांवरील कर्मचार्यांचा सहभाग आहे.
संस्थेत सध्या 274 विद्यार्थी
संस्थेत 274 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. त्यांच्या परीक्षा तसेच प्रॅक्टिकलचे काम हे पुणे शासकीय तंत्रनिकेतन येथून करण्यात येणार आहे. संस्था बंद करण्यासंदर्भातील सविस्तर अहवाल तंत्रशिक्षण संचालनालयाकडे पाठविण्यात आला. सबंधित कर्मचार्यांची तात्पुरत्या स्वरूपात बदली करण्यात आली असून, शासनाकडून येणार्या आदेशानुसार पुढील कारवाई
करण्यात येणार आहे.
दरम्यान शासकीय शैक्षणिक संस्थांमधील रिक्त जागा, आवश्यक पदे आणि ज्या पदांवर कर्मचारी काम करत आहेत त्यांना त्या पदावर खरेच काम आहे का, हे पाहण्याची गरज आहे. कारण शासकीय संस्थांमधील अनेक विभांगामध्ये कर्मचारी केवळ हजेरी लावून पगार घेत आहेत; याची तपासणी होणे आवश्यक असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.