पुणे । मुंढव्यातील शिधापत्रिकाधारकांसाठी वितरीत करण्यात येणार्या शासकीय धान्याचा काळा बाजार करणारा एक ट्रक मुंढवा पलिसांनी बी. टी. कवडे रस्त्यावरून ताब्यात घेतला आहे. ट्रकमधील 390 पोत्यामधील 19 हजार 500 किलो गहू जप्त करण्यात आला असून या गव्हाची खुल्या बाजारातील किंमत 4 लाख 87 हजार रुपये असल्याचे समजते.
संशयावरून हा ट्रक ताब्यात घेतला. त्यामध्ये गव्हाच्या नायलॉनची पोती असून, त्यावर लोणी काळभोर इंडस्ट्रीमधील एका पोल्ट्री कंपनीच्या नावाचा शिक्का आहे. याविषयी पोलिसांनी ट्रकच्या चालकाकडे चौकशी केली असता त्याने संशयित उत्तरे दिली. तसेच धान्याच्या संदर्भात आवश्यक असलेली कागदपत्रेही दाखवली नाही. त्यामुळे पोलिसांचा संशय बळावला. पोलिसांनी यासंदर्भात पुरवठा विभागाशी संपर्क साधून त्यांना ताब्यात घेतलेल्या ट्रकमधील गहू शासकीय आहे का, याबाबत विचारणा केली. तसेच याबाबतचे पत्रही पुरवठा विभागाला दिले. त्यानंतर पुरवठा विभागाकडून याविषयी आवश्यक ती कार्यवाही झाली नाही.
गुन्हा दाखल होण्यास दिरंगाई
पुरवठा विभागातील दोन अधिकार्यांनी मुंढवा पोलिस स्टेशनमधील ताब्यात घेतलेल्या ट्रकमधील गव्हाची पोत्यांची पाहणी केली असता हा गहू शासकीय नसल्याचे सांगितले. त्यामुळे सदर प्रकरणी गुन्हा दाखल होण्यास दिरंगाई होत आहे. शासकीय धान्य काळाबाजार प्रकरणात पुरवठा खात्याचे अधिकारी गुन्हा दाखल करतात, मात्र या प्रकरणात पुरवठा निरीक्षकांनी हातवर केल्याने पुढील कारवाई होण्यास वेळ लागत असल्याचे पालखे यांनी सांगितले. याविषयी मुंढवा पोलिसांशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, पंचनामा करून ट्रक पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. पुरवठा खात्याच्या अधिकार्यांनी याबाबत गुन्हा दाखल केल्यानंतर योग्य ती कारवाई करणार असल्याचे सांगितले. परिमंडल अधिकार्यांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करावा, असे आदेश शहर अन्न धान्य वितरण अधिकार्यांना दिले आहेत. तसेच पालकमंत्री गिरीश बापट यांनी या प्रकरणाची दखल घेऊन संबधित अधिकार्यांकडून याविषयीचा अहवाल मागविला आहे.