भुसावळ। भुसावळसह रावेर व यावल तालुक्यातील शासकीय धान्य गोदामांची तपासणी करण्यासाठी मुंबई येथील विशेष अधिकार्यांचे पथक शनिवारी तालुक्यात दाखल झाले. शासनाकडून वाटप होणार्या धान्याचा दर्जा व गोदामातील उपलब्ध असलेला स्टॉक जुळतो वा नाही यासह विविध बाबींची तपासणी या पथकाकडून केली जात आहे. भुसावळ येथे शनिवारी पुरवठा विभागाचे सहाय्यक संचालक तथा निरीक्षक अधिकारी गणेश पवार व सहाय्यक किरण जाधव यांनी यावल रोडवरील शासकीय धान्य गोदामाची तपासणी केली.
उभय अधिकार्यांनी शासनाकडून आलेल्या धान्यासह वाटप झालेल्या धान्याची ताळमेट स्टॉक रजिस्टरमध्ये जुळते वा नाही याची खातरजमा करून कागदपत्रांची बारकाईने पाहणी केली. तपासणीत काहीही आक्षेपार्ह आढळले नाही, अशी माहिती प्रभारी तहसीलदार संजय तायडे यांनी दिली.