महिला बचतगटाद्वारे कार्यक्रमाचे आयोजन
दापोडी : पिंपरी चिंचवड महानगर पालिकेच्यावतीने महिला वर्गाकरिता विविध शासकीय योजना राबविल्या जात आहेत. त्या अंतर्गत अनुदान सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. महिलांनी याचा लाभ घेऊन आपला विकास साध्य करावा असे आवाहन नगरसेविका चंदा लोखंडे यांनी केले.
पिंपळे गुरव येथील भीमाशंकर कॉलनी येथे सुनीती महिला बचतगट व सुवर्णा महिला बचतगट यांच्या वतीने नुकतेच हळदी कुंकु समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी उपस्थित महिलांना मार्गदर्शन करताना लोखंडे बोलत होते. या वेळी महिला बचत गटाच्या सुवर्णा दळवी, सुनीता लखोटे, कविता दळवी, आरती गुंजाळ, जोस्पीन पाळंदे, चंदा आढाव, एस. सरोज, पुजा दळवी, ऐश्वर्या मगर यासह अनेक महिला उपस्थित होत्या.
अनुदानाचा फायदा घ्यावा!
नगरसेविका लोखंडे पुढे म्हणाल्या की, विधवा, अपंग, घटस्फोटीत महिलांकरिता महापालिकेच्यावतीने अनुदान देण्यात येत असते. अनेक महिलांना याबद्दल माहिती नसते. पात्र महिलांनी या अनुदानाचा उपयोग स्वतःचा आर्थिक विकास करण्यासाठी करावा. अनेक महिलांनी या संधीचा लाभ घेतला आहे. महिलांना स्वावलंबी बनविण्यासाठी कौशल्य कार्यशाळा घेण्यात येत आहेत. शिवणकाम, पाककला, ब्युटीपार्लर आदी छोटे छोटे उद्योग त्या सुरू करून स्वतःचा आणि घराचा विकास करू शकतात.