पुणे । शासकीय योजनांचा लाभ समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहचावा म्हणून विषेश प्रयत्न करणार असल्याचे पुणे जिल्हा परिषदेचे नवे मुख्य कार्यकारी अधिकारी सूरज मांढरे यांनी सांगीतले. पुणे जिल्हा परिषदेचे नवे सीईओ म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मांढरे यांनी बुधवारी पदाचा कार्यभार स्वीकारला. त्यावेळी मावळते ’सीईओ’ दौलत देसाई उपस्थित होते.
समाजातील उपेक्षीत वंचित नागरीकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासन विविध प्रकारच्या योजना राबवित आहे. मात्र, या योजना तळागाळापर्यंत पोहचत नाहीत. त्यामुळे सरकारी योजनांच्या अंमलबजावणीवर ’सीईओ’ म्हणून विशेष लक्ष यापुढे देणार असल्याचे मांढरे यांनी यावेळी सांगितले.
माहिती तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर
जिल्हा परिषदेत विविध विभागांसह पदांवर काम करणारे अनेक अधिकारी असून त्यांच्या आवडी निवडी तसेच कार्यक्षेत्रांचा विचार केला जाईल. त्यांच्या कार्यापेक्षा अन्य कोणत्या कामांची जबाबदारी देता येईल का, याचा विचारही करणार आहोत. त्याशिवाय जिल्ह्यात कोणत्याही भागात पाहणी दौरा करताना केवळ आपल्याच विभागाची पाहणी न करता अन्य विभागांची काय स्थिती आहे याचीही पाहणी अधिकार्यांनी करणे अपेक्षित आहे. त्याकडे आपला भर राहील, असे मुख्य कार्यकारी अधिकारी सूरज मांढरे यांनी सांगितले. जिल्हा परिषदेच्या कामात माहिती तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करणार. तसेच त्याचा अधिकाधिक वापर कसा करता येईल याकडे लक्ष देणार आहे. जिल्हा परिषदेमध्ये कामाची वेगळी संस्कृती निर्माण करण्याचा प्रयत्न राहील, असे त्यांनी पुढे सांगितले.