येरवडा (सोमनाथ साळुंके) । मागासवर्गीय समाजातील विद्यार्थ्यांसाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य्य विभागामार्फत बांधण्यात आलेल्या इमारती परिसरात विद्यार्थ्यांना अनेक अडचणींना सामोरे जाण्याची वेळ येत असल्याने या संकटातून विद्यार्थ्यांची सुटका होणार का? हा मुख्य प्रश्न उपस्थित होत आहे.
राज्यातील मागासवर्गीय समाजातील विद्यार्थी व विद्यार्थ्यांना शिक्षणाचा लाभ मिळावा व त्यांना राहण्याची सुविधा उपलब्ध व्हावी, या उद्देशाने शासनाच्या वतीने ऑगस्ट 1922 साली कोरेगाव पार्क व पुणे स्टेशन येथे इमारती उभारून विद्यार्थ्यांची व्यवस्था करण्यात आली. मात्र शहरात वाढती लोकसंख्या व वाहनांची वर्दळ लक्षात घेता सध्या विश्रांतवाडी भागात स्थलांतर करून या ठिकाणी पाच मजली इमारत उभारून प्रत्येक मजल्यावर एकूण 26 राहण्यासाठी खोल्या असून प्रत्येक खोलीमध्ये कोरेगाव पार्क, पुणे स्टेशन व श्री संत ज्ञानेश्वर सामाजिक न्याय व विशेष विभागातील जवळपास 400 विद्यार्थी हे प्रत्येक खोलीत चार विद्यार्थी राहत आहेत.
रस्त्याची दूरवस्था
शासकीय वसाहतीमध्ये जवळपास 1 हजार विद्यार्थ्यांची राहण्याची व्यवस्था केली आहे. मात्र, इमारतीकडे येण्यार्या रस्त्याची दूरवस्था झाली आहे. रस्त्याच्या सिमेंट काँक्रीटीकरणाचे काम ठेकेदाराने अर्धवट सोडले आहे. काही भागातील रस्ते कच्चे असल्याने त्यावर चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे तेथून मार्गक्रमण कसा करायचा, असा प्रश्न सध्या विद्यार्थ्यांसमोर उभा आहे.
रस्ते अंधारात
वसाहतीकडे जाणार्या रस्त्यावर पथदिवे नसल्याने रात्री हा मार्ग अंधारात जातो. इमारतीच्या लिफ्टचे कामदेखील अर्धवट अवस्थेत असल्याने विद्यार्थ्यांना 5 मजले चढून जावे लागतात. इमारतीचे काम नव्यानेच करण्यात आले असले तरी भिंतींना तडा गेल्या आहेत. त्यामुळे हे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याची शंका व्यक्त करण्यात येत आहे. तर अनेक भिंती या गुटख्यांच्या पिचकारीने रंगल्या असल्याने वसाहतीमध्ये विद्यार्थी अथवा कर्मचारी धूम्रपान करतात का? हा मुख्य सवाल उपस्थित होत आहे.
उद्घाटनाच्या प्रतीक्षेत
विशेष म्हणजे संपूर्ण परिसराचे काम अद्याप ही सुरू झालेले नसून शासकीय वसाहतीची इमारत आजही उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे. या ठिकाणी संबंधित अधिकारी यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही.
प्रशासनाच्या वतीने राज्यातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी वसाहत उभारण्यात आली असली तरी पण सध्या या विद्यार्थ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. विद्यार्थ्यांचा हा मुख्य प्रश्न सुटणार केव्हा?
-राहुल छजलाणी, शाखा अध्यक्ष, मनसे