पोलीस ठाण्यात नोंद ; याच परिसरातील 18 वर्षीय तरुणही बेपत्ता
जळगाव : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तसेच रुग्णालयातील विद्यार्थीनी बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे. दरम्यान याच परिसरातील एक 18 वर्षीय तरुणीह रफूचक्कर झाला असून त्याची पोलिसात नोंद झाली आहे. दरम्यान पारिचारिका असलेली वसतीगृहातील या विद्यार्थीनीने गणवेश परिधान केला आहे. या घटनेचे शासकीय महाविद्यालय पुन्हा चर्चेत आले आहे.
बेपत्ता परिचारिका (विद्यार्थीनी) यावल तालुक्यातील रहिवाशी असून शनिवारी तिची रुग्णालयात आपत्कालिन कक्षात सकाळची ड्युटी होती. वसतीगृहातून आठ वाजता निघाली, मात्र ती ड्युटीवर पोहचलीच नाही. विभागातून विचारणा व्हायला लागल्यानंतर अन्य सहकार्यांनी चौकशी केली, मात्र काहीच माहिती मिळाली नाही. तिच्या आई, वडीलांकडे चौकशी केली असता तेथेही पोहचलेली नव्हती. त्यामुळे घाबरलेल्या आई, वडीलांनी दुपारी रुग्णालय व वसतीगृह गाठले. दोन दिवस सुटी असल्याने वसतीगृहात चौकशी करुनही माहिती मिळाली नाही. त्यामुळे सोमवारी दुपारी परिचारिका हरविल्याची नोंद करण्यात आली.
दोघांची पोलिसात सारखीच नोंद
रुग्णालयाच्या बाहेरुन 18 वर्षीय तरुण त्याच दिवशी व त्याच वेळी गायब झालेला आहे. हा तरुण शहरातीलच रहिवाशी असून त्याचीही सोमवारी दुपारी पोलिसात हरविल्याची नोंद झाली आहे. दोघांच्या नोंदीत फक्त 20 मिनिटाचा फरक आहे. तरुणाची तक्रार आईने तर तरुणीची तक्रार भावाने दिली आहे. दरम्यान, वसतीगृहातून परिचारिका रफूचक्कर झाल्याने एकच खळबळ उडाली असून येथील सुरक्षेचे वाभाडे निघाले आहेत. दरम्यान, ड्युटीवर तसेच वसतीगृहात मोबाईल बंदी असताना येथे मोबाईलचा सर्रास वापर होतो.