जळगाव । बेरोजगारी कमी व्हावी यासाठी शासनातर्फे विविध उपाययोजना करण्यात येत आहे. तरुण सुशिक्षीत बेरोजगारांना रोजगार मिळवून देण्यासाठी शासनाने राज्य अर्थसंकल्पात शंभर कोटीचा अतिरिक्त निधी देण्यात आला आहे. रोजगार निर्मितीसाठी विविध उपक्रम राबविले जाणार आहे. जळगाव जिल्ह्यातील जामनेर आणि मुक्ताईनगर तालुक्यासह राज्यातील 25 तालुक्यातील रोजगार वाढीसाठी शंभर कोटींची तरतूद आहे. 125 तालुक्यांचा मानव विकास निर्देशांक कमी झालेला आहे. त्यामुळे शासनाला रोजगार निर्मितीवर भर द्यावा लागणार आहे. या तालुक्यांमध्ये पथदर्शी स्वरूपात विविध विभागांच्या योजनांच्या एकत्रीकरणातून रोजगार निर्मितीचा कार्यक्रम हाती घेण्यात येणार असून हे तालुके रोजगारयुक्त करण्यात येणार आहेत. हे तालुके रोजगारयुक्त करण्यासाठी जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि प्रशासकीय अधिकार्यांना टीम मानव विकास म्हणून काम पाहणार आहे.
तरुणांना मदत होणार
तालुक्यांना मानव विकास मिशनमधून बाहेर काढण्यासाठी रोजगार वृद्धीचे अनेक उपक्रम हाती घेण्यात येणार आहेत. तालुक्याच्या गरजा, क्षमता आणि साधन संपत्ती तसेच दारिद्र रेषेखालील लोकांची संख्या, बाजारपेठेची गरज अशा विविध गोष्टींचा सखोल अभ्यास करून योजना हाती घेतल्या जाणार आहेत. कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय, मत्स्यव्यवसायास असलेला वाव लक्षात घेऊन त्या-त्या विभागाच्या संबंधित योजनांशी समन्वय साधण्यात येणार आहे.
प्रत्येक तालुक्याचा स्वतंत्र रोजगार आराखडा तयार करण्यात येणार आहे. रोजगारयुक्त तालुके करून त्यांना मानव विकास मिशनमधून बाहेर काढण्यासाठी नियोजन विभागाने संयुक्तराष्ट्र संघासोबत सामंजस्य करार केला असून त्यांच्या मदतीने नियोजन विभागात कुशन रूम तयार करण्यात येत आहे. हे नियोजन कागदावर राहता समाजातील शेवटच्या माणसाला लाभ होईल, हेही पाहिले जावे. मुद्रा बँक योजनेचा या तालुक्यांमध्ये अधिकाधिक लाभ देण्यात यावा. त्यातून युवकांना रोजगाराचे साधन उपलब्ध करून देण्यात याव्यात अशा अपेक्षा व्यक्त करण्यात आल्या आहेत.
पदवी, पदव्युत्तर शिक्षण घेतल्यानंतरही स्पर्धेमुळे प्रत्येकांना रोजगार उपलब्ध होणे कठीण झाले आहे. नोकरी करण्यापेक्षा स्वतःचा उद्योग उभारावे यासाठी शासनातर्फे मुद्रा योजना राबविण्यात येत आहे. तसेच विविध प्रोत्साहनपर योजना शासन राबवित आहे. शासनाने रोजगारयुक्त तालुका करण्याच्या उपक्रमात जामनेर आणि मुक्ताईनर तालुक्याची निवड केल्याने या तालुक्यातील सुशिक्षीत बेरोजगार तरुणांना रोजगार तर उपलब्ध होणार आहे.