जळगाव। कर्जमाफीसंदर्भात गेल्या दोन-तीन महिन्यापासून चर्चा सुरु आहे. शासनाने कर्जमाफीची घोषणा करुन 20 दिवसाचा कालावधी उलटला मात्र अद्यापही कोणत्याही शेतकर्यांना नवीन कर्ज मिळाले नाही किंवा कर्जमाफीसंदर्भात लेखी सुचना देण्यात आलेला नाही. सरकार केवळ कर्जमाफीवरुन राजकारण करीत असून शेतकर्यांची दिशाभूल करीत आहे. शासनाला कर्जमाफीची विसर पडली असून अशा निर्दयी सरकारला जागे करण्यासाठी शिवसेनेतर्फे जिल्हा बँक तसेच स्टेंट बँकेच्या मुख्य शाखेसमोर सोमवारी 10 रोजी ढोल बजाओ आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती शिवसेनेच्या पदाधिकार्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत देण्यात आली. यावेळी आमदार किशोर पाटील, जिल्हाध्यक्ष गुलाबराव वाघ, जिल्हा प्रमुख चंद्रकांत पाटील, माजी आमदार आर.ओ.पाटील, चिमणराव पाटील, जिल्हा परिषद सदस्य प्रताप पाटील, माजी झेडपी सदस्यविश्वनाथ पाटील उपस्थिती होती.
उध्दव ठाकरे यांचा दौरा
शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे हे कर्जमाफीतील त्रुटी, कर्जमाफीचा फायदा कोणाला झाला तसेच शेतकर्यासाठी काय केले पाहिजे याची माहिती घेण्यासाठी संपुर्ण महाराष्ट्र दौरा करीत आहे. बुधवारी 12 रोजी ते जिल्हा दौर्यावर येत आहे. त्यांच्या दौर्याचे नियोजनासाठी शनिवारी 8 रोजी पद्मालय विश्रामगृहात शिवसेना कार्यकर्ते व पदाधिकारी यांची बैठक घेण्यात आली. पक्षप्रमुख ठाकरे यांचे 12 रोजी विमानतळावर आगमन होणार असून त्यानंतर ते पाळधी येथे शेतकर्यांची संवाद साधणार आहे. तसेच धरणगाव व पारोळा येथे सभा घेणार आहे.
जिल्हाबँकेच्या खाद्यांवर बंदूक
राज्यातील बहुतांश जिल्हाबँकेची परिस्थिती ही नाजूक आहे. कर्जमाफीची घोषणा शासन करत आहे. मात्र कर्जमाफी संदर्भातील स्पष्ट निकष अद्यापही जिल्हाबँकेकडे आलेले नाही. कर्जमाफीवरुन शासन जिल्हा बँकेच्या खांद्यावर बंदुक ठेवून गोळी मारत असल्याचे आरोप जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष आमदार किशोर पाटील यांनी केले आहे. रिझर्व्ह बँकेकडून आदेश प्राप्त झाल्याशिवाय बँक आर्थिक बाबी संदर्भात निर्णय घेऊ शकत नाही. ढोल बजाओ आंदोलनाच्या माध्यमातून सरकारच्या निर्णयाचे दुध का दुध पाणी का पाणी करणार असल्याचे त्यांनी सांगितफले.
25 जुलैला राजकीय स्फोट?
शिवसेनेतर्फे येत्या 25 जुलैला राजकीय स्फोट होणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. पक्षप्रमुख स्वतः संपुर्ण राज्यभराचा दौरा करीत आहे. तसेच 24 जुलै पासून पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होणार असून त्याच दिवशी पक्ष प्रमुखांच्या आदेशान्वये राजकीय स्फोटाचे स्पष्टीकरण होईल असे आमदार किशोर पाटील यांनी पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर दिले.