शासनाकडून सहस्रक मतदारांची नोंदणी करण्याचे आदेश

0

पालघर । भारतात दर पाच वर्षांनी लोक प्रतिनिधींच्या निवडणुका निवडणूक आयोगाकडून घेतल्या जातात. या मतदान प्रक्रियेमध्ये भारताचे नागरिकत्व प्राप्त असणार्‍या व्यक्तीस मतदानाचा हक्क बजावण्यासाठी 18 वर्षे पूर्ण वयोमर्यादा ही निवडणूक आयोगाने निश्‍चित केली आहे. निवडणूक आयोगाने यापूर्वी मतदार याद्या जाहीर केलेल्या आहेत. त्या मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम करण्याचा निवडणूक आयोगाने ठरविले असून त्याकरिता निवडणूक आयोगने निकष लावले आहेत. ज्या नागरिकास दि. 1/1/2018 रोजी वयाची 18 वर्षे पूर्ण होत आहेत. आशा सहस्रक मतदारांचा शोध घेऊन त्यांची जास्तीतजास्त संख्येने मतदार म्हणून नोंदणी करण्यांत यावी. अशा सूचना निवडणूक आयोगाने जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी यांना दिल्या आहेत.

निवडणूक साक्षरता क्लब स्थापन केले जाणार
ज्या सहस्रक मतदारांना आपले नाव नोंदवावयाचे आहे. त्यांनी त्या त्या तालुक्याच्या तहसीलदारांकडे मतदार नोंदणी कामी अर्ज नमुना क्र. 6 भरुन द्यावेत. असे जाहीर आवाहन पालघर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी केले आहे. या कार्यक्रमा दरम्यान ज्या सहस्रक मतदारांची नोंदणी होईल. अशा मतदारांचा दि. 25 जानेवारी 2018 रोजी राष्ट्रीय मतदार दिनी जाहीर सत्कार करण्यांत येणार आहे. तसेच पालघर जिल्ह्यातील ज्या व्यक्तींचा जन्म दि. 01/01/2000 रोजी झालेला आहे. त्यांनी मतदार नोंदणी करावी. त्याचप्रमाणे नवीन व भविष्यातील मतदारांची निवडणूक साक्षरता वाढविण्यासाठी शाळा, महाविद्यालये आणि सामाजिक घटकांमध्ये निवडणूक साक्षरता क्लब स्थापन करणेबाबत निवडणूक आयोगाने निर्देश दिले आहेत. त्यानुसार पालघर जिल्ह्यामध्ये निवडणूक साक्षरता क्लब स्थापन केले जाणार आहेत. अशी माहिती जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. नारनवरे यांनी दिली.