शासनाकडे शिक्षकांचे अहवाल सादर करणार

0

जळगाव । अपंग युनिटमधील बोगस नियुक्ती प्रकरणातील गुंता अजूनही सुटत नाही. या प्रकरणातील शिक्षकांच्या कागदपत्रांच्या पडताळणीचे काम सुरूच आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर मार्च 2017 नंतरचे 94 आणि यापूर्वीचे 180 शिक्षक यांचे स्वतंत्र अहवाल तयार करून शासनाकडे सादर केले जाणार आहेत. राज्यभरात भांडाफोड झालेल्या एकात्मिक अपंग शिक्षक योजनेतील समायोजन झालेल्या बोगस नियुक्त्यांचे प्रकरण अजूनही सुरू आहे. यात नियुक्ती देण्यात आलेल्या शिक्षकांवर देखील गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मार्च 2017 नंतरच्या यादीतील 94 शिक्षकांपैकी एका शिक्षकासही नियुक्ती देण्यात आली नसल्याने हे शिक्षक तूर्तास दोषी नसल्याचे दिसून येते. परंतु, मुख्य कार्यकारी अधिकारी दिवेगावकर यांनी प्रथम या 94 शिक्षकांविरुद्ध पोलिसात तक्रार दिली असून, गुन्हा दाखल करण्याचे सांगितले.

दोन अहवाल होणार
अपंग युनिटच्या बोगस नियुक्ती प्रकरणात जिल्हा परिषद प्रशासनाकडून दोन अहवाल तयार करण्यात येणार आहेत. जिल्ह्यातील एकूण 274 शिक्षकांचे प्रकरण आहे. यापैकी मार्च 2017 नंतरच्या 94 शिक्षकांमधील एकाला देखील नियुक्ती देण्यात आलेली नाही. यामुळे या शिक्षकांचा स्वतंत्र अहवाल तयार करण्यात येईल. तसेच मार्च 2017 पूर्वी नियुक्ती देण्यात आलेल्या 180 शिक्षकांचा स्वतंत्र अहवाल असेल. असे दोन्ही अहवाल शासनास सादर केले जाणार आहेत.