अहमदनगर : शिवसेनेने राज्य शासनाकडे दुष्काळामुळे दबललेल्या शेतकऱ्यांसाठी संपूर्ण कर्जमाफीची मागणी केली. मात्र, शासनाने अर्धवट कर्ममाफी केली. बरं कर्जमाफी केली मात्र त्याच्यातला एक छदामही संबंधीत शेतकऱ्याला मिळाला नाही. मग कर्जमाफीचा हा घोटाळा केला कुणी? असा सवाल शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला आहे. अहमदनगर येथे आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते.
शेतकऱ्याला कर्जमाफीचा फायदा मिळालेला नाही त्यामुळे रामदास कदमांनी मंत्रीमंडळाच्या बैठकीत हा कर्जमाफीचा मुद्दा मांडा अशी सूचना उद्धव ठाकरे यांनी जाहीर सभेत केली. त्याचबरोबर त्यांनी पंतप्रधान मोदी यांच्या शिर्डीतील आश्वासनांवर जोरदार टीका केली. ते म्हणाले, कर्जमाफी, टोलमाफी, २०२२ पर्यंत सर्वांना घरं, २०२५पर्यंत सर्वांना पाणी या घोषणा केवळ २०१९च्या निवडणुकीसाठी हा जुमला आहे, गडकरींनी सांगितल्याप्रमाणे केवळ पोकळ घोषणा आहेत. दरम्यान, नगरमध्ये २ शिवसैनिकांच्या हत्या झाल्या. त्यांच्या मारेकऱ्यांना अद्याप का पकडले नाही, असा सवाल करीत विखे, कर्डिले, छिंदम हे लोक म्हणजे नगर जिल्ह्याची ओळख नाही, तर खरा शिवसैनिक हीच नगरची ओळख आहे अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना प्रोत्साहित केले.
उद्धव ठाकरे बोलताना पुढे म्हणाले की, ठोस विचाराशिवाय आम्ही कुठलीच भुमिका घेत नाही. मी हिंदू आहे, उद्याही हिंदू म्हणूनच मरणार आणि हीच आमची हिंदूत्वाची व्याख्या आहे. आमची भुमिका स्वच्छ आहे लपवाछपवी नाही. सरकारचा मी विरोध नाही करीत तर तुमची बाजू मांडतो पण सरकारला जर ते विरोधी वाटत असेल तर मी त्यांचा विरोधक आहे. भाजपावाल्यांना सत्तेत येण्याची खात्री नव्हती. मात्र, महाराष्ट्रावर भगवा फडकवणारच हा आमचा आत्मविश्वास असल्याचा पुनरुच्चारही ठाकरे यांनी केला.