शासनाच्या उदासिनतेमुळे सहकार क्षेत्राची वाताहात

0

जळगाव : सहकार क्षेत्रापासून राजकारण दुर ठेवल्याशिवाय सहकार क्षेत्राचा विकास होणे शक्य नसून सहकार क्षेत्रातील राजकारण नष्ट केले तरच सहकार नावारुपाला येईल. राज्यासह जळगाव जिल्ह्यातील सहकाराचे वाताहत सर्वाना दिसुन येत आहे. सहकार क्षेत्राला मारण्याचे काम अगोदर पश्‍चिम महाराष्ट्रातील राजकारणी मंडळीनी केले आता हेच काम विदर्भातील नेते करीत असल्याचे आरोप सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. जळगाव जिल्हा सरकारी नोकरांची सरकारी पतपेढी ग.स.सोसायटीतर्फे आयोजित सत्कार सोहळ्या प्रसंगी बोलत होते. ग.स.सोसायटीतर्फे रविवारी 26 रोजी रिंग रोडवरील यशोदा हॉल येथे सोसायटी सभासदांच्या गुणवंत पाल्य, आदर्श शिक्षक, ग्रामसेवक, ग्रामविकास विस्तार अधिकारी, पी.एचडी प्राप्त सभासद यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता.

याप्रसंगी 1965 पासून सभासद असलेले सोसायटीचे सर्वात जेष्ठ सभासद गंगाधर महानुभाव, सर्वाधिक वर्गणीदार असलेले सभासद दगडू चव्हाण, नवनिर्वाचित पदविधर आमदार डॉ. सुधीर तांबे यांचा देखील सत्कार करण्यात आला.

कॉग्रेसची अवस्था नवरदेवासारखी
कॉग्रेस पक्षाने राज्यात विकासाची गंगोत्री आणली. कॉग्रेस पक्ष हा सर्वाचा मध्य असून सहकाराची पायाभरणी याच पक्षाने केली आहे. सर्वच राजकीय पक्षाकडून कॉग्रेसच्या पाठिंब्याची मागणी असल्याने कॉग्रेस पक्षाची सद्यांची अवस्था नोकरी गेलेल्या नवरदेवासारखी असल्याचे कॉग्रेस प्रवक्ते आमदार भाई जगताप यांनी ग.स.तर्फे आयोजित सोहळ्या प्रसंगी सांगितले. नोटाबंदीचा काळे पैशावाल्यांना त्रास झाला नसुन हा त्रास सामान्यांना झाला. 137 निष्पाप नागरिकांचा यात जीव गेला सत्ताधारी सरकारला याची साधी खंत देखील नसल्याचे त्यांनी सांगितले.

सोसायटी सर्वंकष विद्यार्थी घडविणार
शासकीय नोकदारांच्या पाल्यांच्या शिक्षणासाठी सर्वाधिक खर्च हा खाजगी शिकवणीवर होत असतो. तरी अपेक्षीत यश खाजगी शिकवणीतून मिळत नाही. सभासदाच्यास पाल्यांसाठी ग.स.सोसायटीतर्फे नाविण्यपूर्ण उपक्रम राबविले जाणार आहे. प्रबोधनी नावाची संस्था स्थापन करुन यात सभासद पाल्यांना मोफत शिकवणी देण्यात येणार आहे. यातून संर्वकष विद्यार्थी घडविण्याचा उद्देश आहे. विविध योजनेच्या माध्यमातून सभासदांना मुलीच्या लग्नासाठी पाच हजाराची आर्थिक मदत दिली जाणार आहे. 21 व्या शतकात टिकू शकतील अशी पिढी घडविण्यासाठी शिक्षकांनी प्रामाणिक प्रयत्न केले पाहिजे असे आवाहन यावेळी करण्यात आले.

यांची होती उपस्थिती
जिल्हा सहकारी नोकरांची सहकारी पतपेढीतर्फे आयोजित सत्कार सोहळ्यासाठी सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, आमदार भाई जगताप, आमदार स्मिता वाघ, आमदार सुधिर तांबे, आमदार शिरीष चौधरी, ग.स.सोसायटी अध्यक्ष तुकाराम बोरोले, उपाध्यक्ष महेश पाटील, विद्या पाटील, सुमन पाटील, हरी बोरोले, सुनिल पाटील, ज्ञानेश्‍वर सोनवणे, सुनिल सुर्यवंशी आदी उपस्थित होते.