शासनाच्या चुकीच्या शैक्षणिक धोरणांमुळे शैक्षणिक स्वायत्तता धोक्यात

0

ज्येष्ठ विचारवंत महेश भारतीय : तोपर्यंत शिक्षण बचाव मोर्चे सुरूच राहणार

मुक्ताईनगर- भाजपा शासनातर्फे जनतेची फसवणूक सुरू असून शैक्षणिक क्षेत्रातही असमानता वाढत आहे. शिक्षण क्षेत्राची अतिशय दयनीय अवस्था झालेली आहे. शासन राबवित असलेल्या चुकीच्या शैक्षणिक धोरणांमुळे शैक्षणिक स्वायत्तता धोक्यात येत आहे, अशा धोरणांना पायबंद न घातल्यास बहुजनांसाठी पुढील काळ अतिशय बिकट असेल यामुळे लोकशाही व्यवस्थाही धोक्यात येणार असल्याचे प्रतिपादन सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे राज्य अध्यक्ष ज्येष्ठ विचारवंत साहित्यिक तथा लेखक महेश भारतीय यांनी मुक्ताईनगर येथे आयोजित पत्रकार परीषदेत केले. मुक्ताईनगर येथे आयोजित सम्यक विद्यार्थी आंदोलनातर्फे आयोजित शिक्षण बचाव मोर्चा निमित्ताने ज्येष्ठ विचारवंत भारतीय शहरात आले होते. मोर्चापूर्वी शनिवारी सकाळी दहा वाजता मुक्ताईनगर येथील शासकीय विश्रामगृहावर त्यांनी प्रसिद्धी माध्यमांशी संवाद साधला

यांची पत्रकार परीषदेला उपस्थिती
भारिपचे जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणे, विश्वनाथ मोरे, एस.एस.तायडे, तालुकाध्यक्ष संजय कांडेलकर, दिलीप पोहेकर धुंदले, सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे जिल्हाध्यक्ष कौस्तुभ शिंदे, जिल्हा संघटक शुभम आसलकर, अजय बोदडे, निलेश सावरणे, अरुण गाडे, गजानन कोळी, बुद्धभूषण मोरे, स्वप्नील इंगळे, सागर जाधव, प्रमोद शिरतुरे आदींची उपस्थिती होती.

बहुजनांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा हेतू
भारतीय म्हणाले की, यूजीसी मध्ये अस्तित्वात असलेला कायदा बदलून त्याऐवजी हायर एज्युकेशन आल्यास त्यामुळे विद्यापीठासह कॉलेजचे स्वायत्तता धोक्यात येणार आहे. शासन वेळोवेळी चुकीचे शैक्षणिक धोरण हेतूपुरस्पर बहुजनांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याच्या हेतूने घेत आहेत त्यामुळेच पुढील काळ बहुजनांसाठी अतिशय बिकट राहणार आहे. गरीबांच्या आत्महत्या व मुलांचे शैक्षणिक नुकसान यात होणार आहे. शिक्षणावर आज रोजी फक्त 0.5 टक्के एवढाच खर्च ठेवला जात आहे. मागासवर्गीयांसह खुल्या वर्गाचीही रीक्त पदे भरण्यात आलेली नाहीत त्यामुळे बेरोजगारीचे प्रमाण वाढलेले आहे. ही भरती तातडीने करावी शाळांची अवस्था अतिशय बिकट झालेली आहे. राज्यामध्ये 65 हजार शाळा असून त्यापैकी जिल्हा परीषदेच्या सुमारे 22 हजार शाळा आज पडक्या अवस्थेत आहेत. अशाही ठिकाणी बहुजनांची मुले शिक्षण घेत आहेत. इतकेच नव्हे तर या खात्याच्या मंत्री असलेल्या नामदार मुंडे यांच्या जिल्ह्यातच दोन हजार 200 शाळा पडक्या अवस्थेत असून त्या दुरुस्तीच्या प्रतीक्षेत आहेत. शिक्षण क्षेत्रात दररोज नवनवीन अन्यायकारक आदेश शासन काढत आहे त्यामुळे शिक्षणात विषमता वाढत आहे. चुकीचे निर्णय असल्याने शिक्षण क्षेत्र अडचणीत आले आहे. बहुजनांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचे षडयंत्र वेळीच हाणून पाडण्याची गरज आहे.

विद्यापीठ अनुदान आयोग बरखास्त करण्याची तयारी
एस.सी.एस.टी.ओबीसी शिष्यवृत्ती सम्यक विद्यार्थी आंदोलनातर्फे शिक्षण बचाव मोर्चे काढल्यानंतरच विद्यार्थ्यांना मिळाली. आजपर्यंत सम्यक विद्यार्थी आंदोलनातर्फे राज्यातील 24 विद्यापीठांवर मार्च 2018 पासून 110 मोर्चे काढण्यात आलेले आहेत. राज्यात एक हजार 300 शाळा पटसंख्येअभावी बंद करण्यात आल्या आहेत. विद्यापीठ अनुदान आयोग बरखास्त करण्याची तयारी सुरू आहे. मौलाना आझाद फेलोशिपसाठी लावण्यात आलेली नेट-सेट परीक्षा पास होण्याची अट रद्द करावी, समाज कल्याण वसतिगृह आतील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भत्त्यात दुपटीने वाढ करावी, डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेतील 75 टक्के उपस्थिती अट रद्द करावी व विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे त्वरीत वाटप करण्यात यावे, सुशिक्षीत बेरोजगारांना प्रति महिना सहा हजार रुपये मानधन देण्यात यावे, मागासवर्गीयांचा बॅकलॉग भरण्यात यावा अशा अनेक मागण्या मागण्यांसाठी सदरचे मोर्चे सुरूच राहणार आहेत आणि या मोर्चाच्या माध्यमातूनच आयआयटीमध्ये शासकीय संस्थांमध्ये आम्ही मागणी केलेल्या 25% महिलांसाठी आरक्षण पैकी 14 टक्के महिलांना आरक्षण देण्यात आलेले आहे. शिक्षण क्षेत्रातील खाजगीकरण थांबवावे अन्यथा सम्यक विद्यार्थी आंदोलनातर्फे लढा भविष्यातही सुरूच राहणार आहे अशी माहिती महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष ज्येष्ठ विचारवंत साहित्यिक लेखक महेश भारतीय यांनी दिली.