जळगाव । शासनाकडून 8 वी पर्यंत विद्यार्थ्यांना नापास न करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच दहावी-बारावीत देखील नापास झालेल्या विद्यार्थ्यांला लगेच एका महिन्यात फेर परीक्षेव्दारे पास केले जाते. त्यामुळे मुलांच्या मनात नापास होण्याची भिती राहिली नाही. नापास होण्याची भिती नसल्याने ‘ब्रेल लिपी’च्या माध्यमातून अभ्यास करण्याकडे दुर्लक्ष करतात. ब्रेन लिपीकडे मुले वळत नसून अंध विद्यार्थी ऑडीओ क्लिपच्या माध्यमातून ऐकुन शिकण्यावर भर देत असल्याने ‘ब्रेल लिपी’ ही मागे पडत जात असल्याचे सूर मू.जे.महाविद्यालयात आयोजित दोन दिवसीय दिव्यांग ’समाजोत्थान’ राज्यस्तरीय दुसर्या साहित्य संमेलनात उमटले.
ब्रेल लिपी मागे पडते आहे का?विषयावर चर्चा मू.जे.महाविद्यालयाच्या जुन्या कॉन्फ्ररन्स सभागृहात आयोजित अंध-अपंगाचे राज्यस्तरीय समाजोत्थान साहित्य संमेलनाच्या शेवटच्या दिवशी ‘ब्रेल लिपी’ सद्यस्थितीत मागे का पडत आहे? या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. या चर्चासत्राच्या अध्यक्षस्थानी प्रभा मेश्राम या होत्या. चर्चासत्रात अशोक पाटील, पद्मा पटेल, काशिनाथ महाजन, शशीकरण कृष्णन, राजेंद्र चव्हाण आदी सहभागी झाले होते.
मेंदुपर्यंत पोहचणारी भाषा
चर्चासत्रात बोलताना पद्मा पटेल यांनी ब्रेल भाषा या बोटांपासून मेंदु पर्यंत पोहचणारी भाषा आहे. वोटींग मशिन, विमानतळासह अनेक ठिकाणी विशेष सूचना या ब्रेल लिपीत असल्याचे सांगितले. काशिनाथ महाजन यांनी सर्व शिक्षा अभियानात विशेष शिक्षक म्हणून अंध व्यक्तींना घेतले जात नसल्याने ब्रेल लिपीला हवा न्याय मिळत नसल्याची त्यांनी खंत व्यक्त केली.
गायनाने आली रंगत
समाजोत्थान संमेलनाच्या दुसर्या दिवसाच्या पहिल्या सत्रात सहभागी साहित्यप्रेमींनी आपले कलागुण सादर केले. संमेलनाध्यक्ष काशिनाथ महाजन यांनी ‘चैतन्यचक्षू’ ही कविता सादर केली. कवी रेवानंद मेश्राम, शारदा गायकवाड, रेखा महाजन, दुर्गा गवई, रमा पाटील, सुवर्णा महाजन, राजेंद्र चव्हाण यांनी मराठीतील कवितांसोबत चित्रपटातील गीते सादर केल्याने संमेलनात रंगत आली. दिव्यांग बांधवांकडून चांगली कलाकृती सादर केली जात असल्याने उपस्थित भारावले होते. राधा बोरडे त्यांनी आपल्या प्रेरणादायी आयुष्याचा जीवनपट उपस्थितांसमोर मांडला. त्यांचे जीवनकार्य हे अतिशय प्रेरणादायी आहे.