ठाणे । शिक्षकांचे कार्यक्रम हे शाळेच्या प्रांगणात आयोजित करावेत. त्यांच्या कार्यक्षेत्रात त्यांना सन्मानित केल्याने त्यांचा आनंद दुप्पट वाढतो. मी माझ्या शिक्षकांचा आजही आदर करतो. कधीही शिक्षक भेटले तर त्यांना वाकून नमस्कार करतो. शिक्षकांचे काही प्रश्न असतील तर सांगावेत. माझ्या माध्यमातून, शासनाच्या माध्यमातून शिक्षकांचे प्रश्न नक्की सोडवू असे प्रतिपादन गृह निर्माण तथा तंत्र व उच्च शिक्षण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी येथे केले. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात आयोजित ’शिक्षक आनंदोत्सव’ कार्यक्रमात ते बोलत होते. न्यायिक लढा पत्रकार सेवा संस्था व रोटरी क्लब ऑफ ठाणे यांच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
मुलीच्या जन्माचे स्वागत करा!
मुलगा आणि मुलगी असा भेद करू नये असे सांगत मुलीच्या जन्माचे स्वागत होणे गरजेचे आहे. मुलगी ही ओझे नसते याउलट आज अनेक क्षेत्रात मुलींनी आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला आहे. रत्नागिरी जिल्ह्याचा पालक मंत्री म्हणून मला अभिमान आहे. यंदा रत्नागिरीचा एस. एस. सी. निकाल 100 टक्के लागला होता, असे वायकर यांनी यावेळी सांगितले. संमेलन अध्यक्ष प्रा. प्रकाश माळी म्हणाले की, घरात पुस्तके विकत आणली किंवा ग्रंथालये पुस्तकांनी भरली, म्हणजे वाचनाची आवड निर्माण होते असे नाही. आजच्या मुलांना ऐकायला आवडते. मात्र वाचायचा कंटाळा आहे. तर आम्ही शिक्षकांनी उत्तमोत्तम पुस्तके वाचली पाहिजेत , त्यातल्या चांगल्या गोष्टी मुलांना सांगितल्या पाहिजेत, असा सल्ला माळी यांनी दिला.
स्पर्धेत विजेत्यांचा सत्कार
स्वागताध्यक्ष ज्योती परब, काबरा यांनी शिक्षकांना मार्गदर्शन केले. प्रास्ताविक रोटरी क्लब ऑफ ठाणे प्रेसिडन्ट विजय परांजपे यांनी केले. यावेळी रोटरी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर बी. एम.शिवराज, प्रेम केवल रामाणी, राज परब, राधिका गुप्ते, न्यायिक लढा पत्रकार सेवा संस्था अध्यक्षा इंदुमती पेठे, आरती कुलकर्णी, राजेंद्र गोसावी, हेमंत नेहते उपस्थित होते. सूत्रसंचालन योगेश जोशी, जयश्री मोहिते यांनी केले. तर आभार मनीषा जोगळेकर यांनी मानले.