धुळे । राज्य शासनातर्फे मानद वन्य जीवरक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. यात धुळे येथील प्रसिध्द पक्षीतज्ज्ञ प्रा. डॉ. पी. एम. व्यवहारे यांचा समावेश आहे. ते गेल्या 40 वर्षांपासून खानदेशातील पक्षी जीवन व त्यांचे पर्यावरणातील महत्व या विषयावर अभ्यास करीत आहेत. ही नियुक्ती पुढील तीन वर्षांसाठी करण्यात आली आहे. प्रा. डॉ.व्यवहारे यांनी प्राणीशास्त्र या विषयात पदव्युत्तर पदवीपर्यंतचे शिक्षण घेतले आहे. ते जिल्ह्यात मानद वन्य जीवरक्षक म्हणून कार्यरत आहेत. महाराष्ट्र राज्य वन्य जीव मंडळाचे सदस्य म्हणून ही त्यांनी चार वर्षे काम पाहिले आहे. प्रा. डॉ. व्यवहारे यांची आतापर्यंत 14 पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यापैकी 2 पुस्तके ही पक्षी जीवनावर आधारीत आहेत. प्रा. डॉ. व्यवहारे यांनी खानदेशातील पक्ष्यांच्या संख्येचे अभिलेख तयार केले आहेत. तसेच त्यंनी पक्षी व पर्यावरणाच्या रक्षणासाठी धुळे नेचर मेटी नावाची संस्था स्थापन केली असून संस्थेच्या माध्यमातून ते पक्षी जीवनाचा अभ्यास करीत आहेत. तसेच धुळे जिल्हा व्याघ्र कक्ष व जैवविविधता समितीचे ते सदस्य आहेत. त्यांनी पक्षी जीवनावरील वेगवेगळी छायाचित्रेही काढलेली आहेत.