बारामती । महाराजस्व अभियानांतर्गत शासनाच्या विविध खात्यासंबंधी योजना ग्रामस्तरावर उपलब्ध करून देण्यात येत असून नागरीकांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन तहसिलदार हनुमंत पाटील यांनी केले.
महाराजस्व अभियानांतर्गत विस्तारीत समाधान योजना मेळावा बारामतीतील वढाणे येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते. जिल्हा परिषद सदस्य भरत खैरे, पंचायत समिती सदस्या नीता बारवकर, माजी जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर कवले, कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालिका रत्नप्रभा चौधरी, सरपंच सुनिता लकडे, उपसरपंच वनिता चौधरी, तालुका कषी अधिकारी संतोषकुमार बरकडे, विविध शासकीय विभागाचे अधिकारी याप्रसंगी उपस्थित होते.सर्वसामान्य जनतेस शैक्षणिक व अन्य कामांकरीता विविध दाखल्यांची आवश्यकता असते. मेळाव्याद्वारे नागरीकांना विनासायास व विनाखर्च दाखले उपलब्ध करून देण्यात येत आहेत. योजनांविषयी काही समस्या असल्यास जागेवरच निराकरण करण्यात येत असल्याचे हनुमंत पाटील यांनी यावेळी सांगितले. या अभियानांतर्गत महिला खातेदारांच्या महसूल विभागाविषयी असलेल्या समस्या जाणून घेऊन त्याच ठिकाणी प्राधान्याने निराकरण करण्यात येत आहे. शासनाच्या विविध महिलाविषयक योजनांची माहिती देण्यात येत असून महिलांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन पाटील यांनी यावेळी केले.