शासनाच्या वृक्षारोपण कार्यक्रमातुन सा.बां. विभाग अधिकार्‍यांचे चांगभलं!

0

शेंदुर्णी (विकास अहिर)। दरवर्षीप्रमाणे पावसाळ्यात यावर्षीही शासनाने मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण कार्यक्रम हाती घेतला असून जळगाव जिल्ह्यात शासनाचे विविध विभागाचे वतीने लाखो वृक्षलागवड करणार असल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे घोषित करण्यात आले आहे व तसे नियोजन करून मोठा गाजावाजा करून वृक्षारोपणासाठी सर्वात जास्त प्रमाणात जमीन उपलब्ध असलेल्या सार्वजनिक बांधकाम विभाग अर्थात पीडब्लूडी खाते दरवर्षी लाखो रुपयांचा निधी खर्च करून अखत्यारीतील राज्य मार्ग व महामार्गावर वृक्षारोपण करीत असल्याचे सांगितले जाते. मात्र या कार्यक्रमात सहभागी होणारे अधिकारी व कर्मचारी यात आपले हात ओले न करता शंभर टक्के कार्यक्रम यशस्वी केल्याचा आव आणत असले तरी खरी परिस्थिती वेगळीच आहे.

डेरेदार वृक्ष पेटविणार्‍यांवर कारवाई नाहीच
या कार्यक्रमातुन सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने प्रत्यक्षात वृक्ष लागवड न करता रस्त्याचे कडेला निसर्गतः उगवलेल्या आडजात पळस, बाभूळ,जातींचे वृक्षांना आळे करून व लाल कपड्याची निशाणी बांधून नवीन वृक्षारोपण केल्याचा भास निर्माण केला जात आहे व त्यातून शासनाचे वृक्षारोपण कार्यक्रमाची वाट लावून निधीवर अनेक वर्षांपासून डल्ला मारला जात आहे. तसेच कोट्यवधी वृक्ष लागवड झाल्याची दरवर्षी गणना होत आहे मात्र रस्त्यावरून वापरणारे नागरिकांना सार्वजनिक बांधकाम विभागाचे वतीने लागवड होऊन डेरेदार वृक्षात रूपांतर झालेल्या एकाही वृक्षाची सावली लाभली नाही की रस्त्यावर मोठे मोठे वृक्ष सार्वजनिक बांधकाम विभागाचे वतीने वाढवली जात असल्याचे दिसून आले नाही मात्र या कार्यक्रमातुन शासनाचे व जनतेच्या नजरेत धूळफेक करून वृक्षारोपणनिधीतुन अधिकार्‍यांचे चांगभलं होत असल्याचे दिसून येत आहे ग्रामीण भागात मात्र रस्त्यावर उगवलेल्या आडजात वृक्षांना बांधलेले लाल चिंध्या म्हणजे रस्ता रुंदीकरण होत असल्याचा समज निर्माण होत आहे. उन्हाळ्यात शेताचे बांधाजवळील सार्वजनिक बांधकाम विभागाचे मालकीची डेरेदार वृक्ष पेटवून नष्ट करणार्‍या व्यक्तीवर सार्वजनिक बांधकाम विभागाचे वतीने आजपर्यंत कुठेही कुठल्याही प्रकारची कार्यवाही केल्याचे दिसून येत नाही.

वृक्षप्रेमींमध्ये नाराजी
दरवर्षी वृक्षरोपण कार्यक्रमातून मलिदा मिळत असल्याने त्यात गुंतलेले अधिकारी मात्र चातकासारखी पावसाळा सुरू होण्याची वाट पाहत असतात. निधीवर डल्ला मारतात परंतु पीडब्लूडी खाते प्रमुखांना प्रत्यक्ष रस्त्यांना भेट देऊन वृक्ष लागवडीसाठी रोपवाटिकेतून कोणत्या जातीची व प्रकारची वृक्ष रोपे लागवडीसाठी खरेदी करण्यात आली. तसेच लागवड झालेले वृक्ष व प्रत्यक्षात दिसणारे वृक्ष याची मोजदाद करून शहानिशा करण्यास वेळच नसल्याने शासनाचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे वृक्षरोपण कार्यक्रम व त्याद्वारे होणारा कोट्यवधी रुपयांचे निधीचा बट्ट्याबोळ थांबवणे शक्य नसल्याने वृक्षप्रेमी नागरिकांकडून खंत व्यक्त केली जात आहे.