शासनाच्या सेवा शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्नशील

0

धुळे : प्रशासकीय कामकाज पारदर्शक आणि गतिमान करीत शासनाच्या विविध योजना, सेवा समाजातील शेवटच्या घटकापर्यंत वेळेत पोहोचविण्याबरोबरच सर्वसामान्य जनतेचे प्रश्न गांभीर्याने जाणून घेत ते निर्धारित वेळेत सोडवावेत, असे प्रतिपादन अपर तहसीलदार ज्योती देवरे यांनी येथे केले. जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण केंद्र येथे आज दुपारी सुशासन दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी त्या बोलत होत्या. नायब तहसीलदार गिरीश कुलकर्णी, प्रा. बेलन, एस. सी. बाविस्कर, जे. एस. पाटील उपस्थित होते. यावेळी प्याराबाई अध्यापिका विद्यालय, एल. एम. सरदार अध्यापिका विद्यालयाच्या विद्यार्थिंनीनी पथनाट्य सादर केले.

कर्तव्यात कसूर करू नये
देवरे म्हणाल्या, शासनाच्या सेवा विहित मर्यादेत सर्वसामान्यांना देण्यासाठी शासनाने महाराष्ट्र लोकसेवा हमी अधिनियमाची अंमलबजावणी सुरू केली आहे. त्यात महसूल विभागाच्या 25 सेवांचा समावेश आहे. त्यामुळे प्रत्येक अधिकारी, कर्मचाऱ्याने कामात तत्परता दाखवीत वेळेत काम पूर्ण करावे. प्रशासकीय कामकाज पूर्ण करताना कर्तव्यात कसूर करू नये. वेळेत प्रश्न सोडविले, तर कामकाजात सुसूत्रता येईल. तसेच या अधिनियमामुळे प्रशासकीय कामकाज पारदर्शक व गतिमान होईल. शासनाच्या योजना तळागाळातील घटकापर्यंत पोहोचविताना महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमाची प्रभावी अंमलबजावणी करावी. शेवटच्या घटकाला न्याय मिळवून देण्यासाठी कर्मचाऱ्यांनी संवेदनशील राहावे, असेही देवरे यांनी नमूद केले. पाटील यांनी प्रास्ताविक, सूत्रसंचालन करुन आभार मानले. यावेळी विविध विभागांचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.