महाराष्ट्र पुरोगामी पत्रकार संघाचे कोअर कमेटीचे प्रदेशाध्यक्ष विनोद पवार यांची मागणी
जळगाव:देशासह महाराष्ट्र राज्यातही सध्या कोरोनाच्या विषाणुमुळे सर्व जनजीवनच विस्कळीत झाले आहे. गेल्या मार्चपासून सुरु झालेल्या लॉकडाऊनची झळ अनेकांना बसली आहे. त्यातच कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढतच आहे. सोबतच मृत्यूची संख्या वाढत आहे. त्यामुळे शासनाने कोरोना बाधित मयताच्या परिवाराला 10 लाखाची मदत जाहीर करावी, अशी मागणी महाराष्ट्र पुरोगामी पत्रकार संघाचे कोअर कमेटीचे प्रदेशाध्यक्ष विनोद पवार यांनी केली आहे.
कोरोना विषाणूच्या प्रादूर्भावामुळे अनेक सर्वसामान्य रुग्णांना आपला जिव गमवावा लागला आहे. अशा परिस्थितीत राज्यात कोरोनाचे संक्रमण दिवसेंदिवस वाढतच आहे. सध्या कोरोनाच्या महामारीत स्वत:च्या जीवाची पर्वा न करता अनेकांनी रुग्ण सेवेत झोकुन दिले आहे. मात्र, अशा महामारीत विविध विषयांबाबत शासनाची भूमिका अद्यापही उदासिन असल्याचे दिसून येते. शासनाकडून शेतकर्यांना मोठ्या प्रमाणावर निधी आणि मदतही दिली जाते. अशावेळी कोरोना बाधित झालेल्या सर्वसामान्य रुग्णाच्या मृत्यूनंतर परिवाराला आर्थिक मदत देण्याची नितांत गरज आहे. आधीच हातावर पोट भरणार्यांना टाळेबंदीत विविध संकटांना सामोरे जावे लागत आहे. त्यातच घरातील कर्ता पुरुष गेल्यावर परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळतो. त्याच्यानंतर परिवाराला आर्थिक संकटाचा सामना करण्याचीही वेळ येते. त्यामुळे शासनाने अशावेळी सर्वसामान्य कोरोना बाधित रुग्णाचा मृत्यू झाल्यावर त्याच्या परिवाराला मदतीचा हात म्हणून 10 लाखाची मदत जाहीर करावी, अशी मागणी महाराष्ट्र पुरोगामी पत्रकार संघाचे कोअर कमेटीचे प्रदेशाध्यक्ष विनोद पवार यांनी केली आहे.
Next Post