शासनाने पीक विमा योजनेची मुदत महिनाभरासाठी वाढवावी

0

मुक्ताईनगर । राज्य सरकारने पीक विमा योजनेत येणार्या सर्व समस्या दूर कराव्या, जेणेकरून येणार्‍या खरीप हंगाम 2017 मध्ये शेतकर्यांचा पीक विमा योजनेत सहभागी वाढेल व त्यांचे नुकसान झाल्यास त्यांना नुकसान भरपाई लवकरात लवकर मिळेल अशा सुचना केंद्र सरकारने राज्य सरकारला द्याव्यात. तसेच पीक विम्याची मुदत आणखी महिनाभरासाठी वाढविण्यात येण्याची मागणी खासदार रक्षा खडसे यांनी लोकसभेत मागणी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने शेतकर्‍यांच्या हितासाठी व विकासासाठी अनेक कल्याणकारी योजना आणल्या. त्यापैकी प्रधानमंत्री पीक विमा योजनेत खरीप 2016 पासून अत्यंत कमी प्रीमियम भरून पीक विमा योजनेचा फायदा घेता येणार होता.

खासदार रक्षा खडसे यांची लोकसभेत मागणी
शेतकर्‍यांना देखील प्रधानमंत्री पीक विमा योजना फायद्याची वाटल्यामुळे पीक विमा योजने अंतर्गत सिंचन क्षेत्र वाढले आणि या योजनेत सहभागी होणार्‍या शेतकर्‍यांची संख्या वाढली. दुर्दैवाने बर्‍याच राज्यांनी या योजनेत कमी स्वारस्य दाखवले व त्यांच्या बेजबाबदार धोरणामुळे खरीप 2016 मध्ये झालेल्या पीक नुकसानीची भरपाई शेतकर्‍यांना खूप उशिराने किंवा कमी प्रमाणात मिळाली, काही शेतकर्‍यांना तर लाभच मिळाला नाही. अनेक राज्यांमध्ये पिके निश्चित करणे, जिल्ह्याचे विभाग तयार करणे, जिल्हास्तरीय समितीद्वारे पिकविम्याची भरपाई रक्कम निश्चित करणे, पीक विमा प्रीमियमचा भरणा विमा कंपनीत त्वरित करणे, पिकाच्या नुकसानीची सुचना कंपनीला लवकरात लवकर कळवणे व विमा कंपनीद्वारे नुकसान झालेल्या पिकाची नुकसान भरपाई त्वरित मिळवून देणे या कामांमध्ये दिरंगाई झाल्यामुळे प्रधानमंत्री पीक विमा योजना चांगली असूनही त्याचा लाभ अनेक शेतकर्‍यांना झाला नाही. पीक विम्याचा प्रीमियम भरण्यासाठी राज्य सरकारने दोन महिन्यांचा काळ निश्चित केला आहे परंतु या दोन महिन्यात शेतकरी शेतीच्या कामात अत्यंत व्यस्त असल्या कारणाने अनेक शेतकर्‍यांना पीक विम्याचा प्रीमियम भरण्यासाठी वेळ मिळाला नाही.

शेतकरी नुकसान टाळा
खासदार रक्षा खडसे यांनी मागणी केली की प्रधानमंत्री पीक विमा योजनेच प्रीमियम भरण्याची शेवटची तारीख 31 जुलै होती तिचा अवधी आणखी 1 महिन्याने वाढवण्यात यावा आणि पुढील वर्षी या तारखेचे नियोजन अशा प्रकारे करावे जेणेकरून जास्तीत जास्त शेतकरी निर्धारीत तारखेच्या आत प्रीमियम भरू शकतील व नुकसान झाल्यास पीक विम्याची भरपाई त्यांना त्वरित मिळेल अशी व्यवस्था करावी, यामुळे शेतकर्यांचे मनोबल उंचावेल व शेतकर्यांच्या जीवनात खूप मोठे परिवर्तन घडवून येईल अशी अपेक्षा खासदार खडसे यांनी व्यक्त केली आहे.