शासनाने बोन्सायला प्रोत्साहन देण्याची गरज : प्राजक्ता काळे

0

पुण्यात ‘बोन्साय नमस्ते’ भारतातील पहिली जागतिक परिषद

पुणे :- आपल्याच देशात उगम पावलेली बोन्साय कला आज जगभरात प्रसिद्धी मिळवीत आहे. मात्र अद्यापही या कलेबद्दल आपल्या नागरिकांना माहिती नाही. याची माहिती नागरिकांना व्हावी आणि मुख्यत: या कलेच्या माध्यमातून शेतीला पूरक व्यवसाय निर्माण व्हावा हा आमचा उद्देश आहे आणि तो साध्य व्हावा यासाठी शासनाने बोन्सयला प्रोत्साहन देत कृषी व फलोत्पादन महाविद्यालयातील अभ्यासक्रमांमध्ये त्याचा समावेश करावा, असे मत बोन्साय कलाकार प्राजक्ता काळे यांनी व्यक्त केले.

‘बोन्साय नमस्ते’ या भारतातील पहिल्या जागतिक परिषदेत आज दुस-या दिवशी राज्यभरातील कृषी व फलोत्पादन महाविद्यालयातील शिक्षकांना व कृषी अधिका-यांना बोन्सायचे मोफत प्राथमिक शिक्षण देण्यात आले, त्यावेळी त्या बोलत होत्या. इंडोनेशियातील प्रसिद्ध बोन्साय मास्टर रुडी नाजोन हेही यावेळी उपस्थित होते.

बोन्साय कलेकडे वळायला हवे
प्राजक्ता काळे म्हणाल्या, आपल्या देशात नागरीकांना फलोत्पादनाची आवड नाही. परदेशाचा विचार केला तर त्या ठिकाणी नागरिक शनिवारी व रविवार निसर्गाच्या जवळ जात बागकामात रमताना पहायला मिळतात. आपल्यालाही हे निसर्गावरील प्रेम जपण्यासाठी बोन्साय कलेकडे वळायला हवे. त्यासाठी प्रोत्साहनाची गरज आहे. हे प्रोत्साहन शासकीय पातळीवर मिळणे आज गरजेचे असून त्या प्रोत्साहनाच्या बळावर आपण आपल्याच देशात उगम पावलेली ही कला वाढविण्यासाठी प्रयत्न करू शकू.

राज्यातील कृषी व फलोत्पादन महाविद्यालयातील शिक्षक व कृषी अधिकारी यांना यावेळी मोफत प्रशिक्षण दिले गेले. ज्यामध्ये बोन्सायचे विविध प्रकार, प्री बोन्साय मटेरियल पासून बोन्साय होण्यापर्यंतची प्रक्रिया, बोन्सायला आकार देणे, त्यांची मुळे योग्य पद्धतीने कटिंग करणे, बोन्सायसाठी आवश्यक असलेल्या मातीची माहिती घेणे याबरोबरच बोन्साय संबंधीचे प्राथमिक शिक्षण देण्यात आले. प्रदर्शन रविवार (दि.25) पर्यंत सकाळी 9 ते रात्री 10 वाजेपर्यंत सुरु राहणार असून, ते सर्वांसाठी विनामूल्य खुले आहे.

शेतकर्‍यांना फायदा होईल
या प्रशिक्षणात सहभागी झालेले सातारा जिल्ह्यातील कृषी चिकित्सालयाचे कृषी अधिकारी निवासराव खबाले म्हणाले, या परिषदेमुळे एक नवीनच कला लोकांसमोर येत आहे. या ठिकाणी बोन्साय निर्मितीचे प्रशिक्षण घेऊन आमच्या भागात या कलेला प्रोत्साहित करण्यात येईल. शेतकर्‍यांना ही कला कळाली तर शेतातील फार उपयोगात न येणार्‍या झाडांना बोन्सायचे रूप देऊन त्यांना रोजगार मिळेल. पाण्याची उपलब्धता कमी असलेल्या ठिकाणी शेतकर्‍यांना बोन्साय कला व्यवसायाचा चांगला पर्याय ठरू शकते. महिलांनाही रोजगार उपलब्ध होण्यास मदत होईल.

जोडधंदा म्हणून कला महत्वाची
अकोल्यातील शिरसो गावातील कृषि चिकित्सालय वाटिकेचे प्रशांत वानखेडे म्हणाले या परिषदेच्या माध्यमातून या कलेबाबत माझ्या ज्ञानात खूप भर पडली. या पुढे आमच्या नर्सरीत या कलेचा अंतर्भाव करून शेतर्‍यांना आम्ही प्रशिक्षित करणार आहोत. जोड धंदा म्हणून त्यांच्यासाठी ही नवीन कला महत्वाची ठरेल असा आमचा विश्‍वास आहे. तसेच बोन्साय ला बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचाही आमचा प्रयत्न असेल. कृषि क्षेत्रातील रोजागाराच्या दृष्टिने ही परिषद महत्वाची ठरणार आहे.