भुसावळ। माध्यमिक सत्रात कला व क्रिडा विषयाच्या तासिका कमी केल्यामुळे महाराष्ट्र कला व क्रिडा शारिरीक शिक्षक महासंघ व कला व क्रिडा समन्वय समिती सहयोगी संघटनांनी राज्यभरात जोरदार आंदोलने केलीत. याची दखल घेत शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक बोलवण्यात आली. यात चर्चा होऊन कला व शारीरिक शिक्षण विषयाच्या चार तासिका पूर्ववत ठेवण्याचा सकारात्मक निर्णय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी घेतला. शालेय वेळापत्रकात सोमवार ते गुरुवारी प्रत्येक तासिका 35 मिनीट राहील. व शुक्रवार व शनिवार रोजी 30मिनीट राहील. संपूर्ण वेळापत्रकात 25 मिनीट वाढ होईल. हे सर्व संघटनांनी मान्य केले. क्रीडा व शारीरिक शिक्षण महासंघ यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाला शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी आमंत्रित केले होते.
समन्वय समितीच्या लढ्यास यश
शैक्षणिक वर्ष 2017-18 पासून करण्यात आलेल्या विषयावर तासिका विभागणी कला, क्रीडा व कायार्नुभव विषयासंदर्भात उपस्थित झालेल्या प्रश्नासंदर्भात मंत्री तावडे यांनी महासंघाच्या पदाधिकार्याशी सविस्तर चर्चा केली. सुमारे एक ते सव्वा तास चाललेल्या या चर्चेमध्ये महासंघाच्या विविध विषयांवर समाधानकारक चर्चा करण्यात आली. बैठकीत खालीलप्रमाणे निर्णय घेण्यात आले. कला व शारीरिक शिक्षण या विषयासाठी वेळापत्रकात चार तासिका देण्यात येतील. व हे पद कायम राहातील तसेच ते शिक्षक अतीरिक्त होणार नाहीत.
बैठकीस यांची होती उपस्थिती
या बैठकीला शिक्षणमंत्री विनोद तावडे, पुणे विद्या प्राधिकरणचे संचालक सुनील मगर, कापडणीस, उपसचिव डॉ.सुवर्णा खरात, क्रीडा उपसंचालक मोटे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. या शिष्टमंडळामध्ये आमदार संजय केळकर(ठाणे), माजी शिक्षक आमदार भगवान साळुंके, महासंघाचे अध्यक्ष शरदचंद्र धारुरकर, निमंत्रक विजय बहाळकर, महाराष्ट्र शिक्षक परिषदेचे अध्यक्ष वेणुनाथ कडू, कलाअध्यापक संघाचे अध्यक्ष पी.आर.पाटील, प्रदीप साखरे, विश्वनाथ पाटोळे, सुरेश मुळूक, मिलिंद क्षीरसागर, मकरंद कोराळकर, कमलाकर ठोके, चंद्रकांत पाटील, शिवदत्त ढवळे, राजेंद्र कोतकर, डॉ.ओमप्रकाश जोशी, जे.बी.मदने, महेंद्र भोसले, मनोहर यादव, मारोती माने, आर.वाय. जाधव यांच्यासह सर्व जिल्ह्यातील प्रतिनिधी उपस्थित होते.
शिक्षण मंत्री कला व क्रिडा विषयाच्या संदर्भात सकारात्मक होते. विद्यार्थ्यांच्या कला व क्रिडा गुणांना प्रोत्साहन मिळावे व कला, क्रिडा संस्कृती जोपासावी यासाठी त्यांनी चार तासिका केल्या. तसेच संघटनेच्या आंदोलनात सर्व शिक्षकांनी जी साथ दिली, त्या सर्वांच्या सहकार्यानेच हे यश मिळाले.
प्रदिप साखरे,
जिल्हाध्यक्ष महाराष्ट्र राज्य क्रिडा व शारिरीक शिक्षक महासंघ तथा समन्वय समिती सदस्य