अॅड. सतीश गोरडे : पद्मश्री नामदेव ढसाळ साहित्य पुरस्काराचे वितरण
राजगुरुनगर । खेडचे सुपुत्र नामदेव ढसाळ यांच्या गोलपीठा ने मराठी साहित्य समृद्ध झाले. माणूस हा केंद्रबिंदू मानून मातीतल्या भावनांना त्यांनी वैश्विक स्वरूप दिले. यापुढे नामदेव ढसाळ साहित्य पुरस्कार हे महाराष्ट्र शासन प्रायोजित करेल, अशी ग्वाही सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांनी दिल्याची माहिती जनसेवा बँकेचे माजी अध्यक्ष अॅड. सतीश गोरडे यांनी महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या राजगुरूनगर शाखेच्या पुरस्कार वितरण सोहळ्यात दिली.
म.सा.प. शाखा राजगुरूनगर, ग्रामपंचायत पुर व कै. नानासाहेब गोरडे सार्वजनिक वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने पद्मश्री नामदेव ढसाळ साहित्य पुरस्कार वितरण व कविसंमेलन राजगुरूनगर येथे आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. ज्येष्ठ विचारवंत व साहित्य मंडळाचे माजी अध्यक्ष प्रा. रतनलाल सोनग्रा, आमदार जयदेव गायकवाड, विजय कोलते, शरद बुट्टे, गजानन क्षीरसागर, अरूणम सकट आदी मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते.
विविध पुरस्कारांचे वितरण
ज्यांना जग सुंदर करायचं आहे त्यांनी सौंदर्याचा तिरस्कार करता कामा नये. कवी, लेखक व कलावंताला जात नसते, ते सर्व समाजाचे असतात, असे प्रतिपादन सोनग्रा यांनी केले. यावेळी रावसाहेब कुवर यांच्या हरवलेल्या आवाजाची फिर्याद, पी. विठ्ठल यांच्या शुन्य एक मी, प्रा. संध्या रंगारी यांच्या वाताहातीची कैफियत, सुधीर इनामदार यांच्या इजांची मखमल, अमृत तेलंग यांच्या पुन्हा फुटतो भादवा या सर्वोत्कृष्ट पाच काव्यसंग्रहांना रोख रक्कम, मानपत्र, शाल, श्रीफळ देऊन गौरविण्यात आले. तसेच लोककवी प्रशांत मोरे यांना पद्मश्री नामदेव ढसाळ साहित्य गौरव पुरस्कार, साहेबराव पवळे यांच्या ’बहर’ या काव्यसंग्रहाला उत्तेजनार्थ पारितोषिक, भरत उढाणे व काशिनाथ माटल यांना स्व. नारायण मेघाजी लोखंडे गुणवंत कामगार पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
कवीसंमेलनात 40 कवींचा सहभाग
लोककवी प्रशांत मोरे यांच्या भरदार आवाजातील कवितांना श्रोत्यांनी भरभरून दाद दिली. कवयित्री शोभा जोशी यांच्या अध्यक्षतेखाली दुसर्या सत्रामध्ये कवीसंमेलन रंगले. या कवीसंमेलनात सुमारे 40 कवींनी सहभाग घेऊन कवीता सादर केल्या. कार्यक्रमाचे संयोजन व प्रास्ताविक राजगुरूनगर शाखेचे अध्यक्ष संतोष गाढवे यांनी तर नियोजन उपाध्यक्ष सदाशिव आमराळे, कार्याध्यक्ष भिमराव पाटील, मिनाक्षी पाटोळे, कविता धुमाळ, स्मिता पवळे, दिपाकांत राक्षे, अरूणा राक्षे, प्रा. सुभाष साळुंके, किशोर भगत, भवारी सर यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धर्मराज पवळे तर आभार स्मिता पवळे यांनी मानले.