शासन योजनांच्या माहितीसाठी संवादपर्व उपयुक्त

0

पालघर । कृषी व जलसंधारणाच्या सोबतच शासनाच्या विविध योजनांची माहिती गाव-शिवारापर्यंत पोहोचवण्यासाठी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीने राबवण्यात येत असलेले संवादपर्व उपयुक्त ठरेल, असा विश्‍वास तालुका कृषी अधिकारी आनंद कांबळे यांनी व्यक्त केला. जव्हार तालुक्यातील बायफ (मित्रा) विभागीय प्रशिक्षण संस्था येथे माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या जिल्हा माहिती कार्यालय, पालघरच्या वतीने गणेशोत्सव कालावधीत राबवण्यात येणार्‍या संवादपर्व कार्यक्रमात ते बोलत होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाने जलयुक्त शिवार अभियान अत्यंत प्रभावीपणे राबवण्यात येत आहे. जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून जव्हार पाणीटंचाईमुक्त करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. राष्ट्रीय फलोत्पादन विकास अभियान या योजनांचा जव्हार तालुक्यातील शेतकर्‍यांनी लाभ घेण्याचे आवाहनही कांबळे यांनी केले. उन्नत शेती समृद्ध शेतकरी अभियान व स्व. गोपीनाथ मुंढे शेतकरी जनता अपघात विमा या योजनांची माहिती यावेळी दिली. प्रास्ताविकातून प्र. जिल्हा माहिती अधिकारी कोकरे यांनी संवादपर्व आयोजनामागची भूमिका विशद केली. यावेळी प्र. जिल्हा माहिती अधिकारी दत्तात्रय कोकरे, यशदाचे साधन व्यक्ती मच्छिंद्र पंडीत, कृषी सहायक, वनरक्षक, ग्रामसेवक, सरपंच, पदाधिकारी, शेतकरी आदी उपस्थित होते.