शासन शेतकऱ्यांच्या पाठिशी – पांडुरंग फुंडकर

0

मुंबई | राज्य शासन शेतकऱ्यांच्या हिताच्या विविध योजना राबवित असून पावसाने ओढ दिल्यामुळे शेतकऱ्यांना टंचाई परिस्थितीचा सामना करावा लागल्यास सरकार शेतकऱ्याच्या पाठीशी ठामपणे उभे राहील, कोणत्याही शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडले जाणार नाही, असे कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी शुक्रवारी विधानसभेत सांगितले. विधानसभा नियम २९२ अन्वये विरोधी पक्षामार्फत मांडण्यात आलेल्या अंतिम आठवडा प्रस्तावास उत्तर देताना ते बोलत होते.

फुंडकर म्हणाले, टंचाई परिस्थितीवर मात करण्यासाठी शासनाने जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून ११ लाख हेक्टरपेक्षा अधिक जमीन सिंचनाखाली आणली आहे. तर, ११ हजार गावे दुष्काळापासून सुरक्षित करण्यात आली आहेत. शेती क्षेत्रातील गुंतवणूक वाढवून प्रक्रिया उद्योग उभारण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पीक विमा योजना लागू करताना जेथे ऑनलाईन अर्ज भरणे शक्य नाही तेथे ऑफलाईन अर्ज भरून घेण्याची भूमिका शासनाने घेतली आहे.

समृद्धी महामार्गाबाबत उपस्थित करण्यात आलेल्या मुद्यांचा आढावा घेताना सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, राज्यातील १४ जिल्ह्यांना जोडणारा समृद्धी महामार्ग हा शेतकऱ्यांच्या फायद्याचाच उपक्रम असून यामुळे नागपूर ते मुंबई अंतर ६ ते ८ तासांवर येणार आहे. या मार्गासाठी बाजारभावापेक्षा अधिकच्या दराने जमीन घेण्यात येऊन आरटीजीएसद्वारे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात थेट जमा होत असल्याने शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. सर्वांना विश्वासात घेऊन आणि संवादाच्या माध्यमातून सर्व समस्या आणि तक्रारींचे निवारण करण्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

सहकार व पणन विभागांच्या प्रश्नांवर उत्तर देताना सहकार मंत्री सुभाष देशमुख म्हणाले, यावर्षी तुरीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात झाल्याने आतापर्यंत ६० लक्ष क्विंटल तूर खरेदी करण्यात आली असून यासाठी आठ वेळा मुदतवाढ देण्यात आली आहे. तसेच ३१ जुलै पर्यंतची सर्व देयके अदा करण्यात आली आहेत. कर्जमाफीमध्ये पुनर्गठनाचा समावेश करण्यात आला असून गावपातळीपर्यंत प्रत्येक कर्जदाराची यादी जाहीर करण्यात येणार आहे. थकीत कर्जदाराला पहिल्यांदाच हमी देण्यात आली असून शेतकऱ्यांच्या हिताचेच शासन निर्णय जारी केले आहेत. सर्वांना विश्वासात घेऊन पात्र असलेल्या सर्व तूर उत्पादक शेतकऱ्यांची तूर खरेदी करणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.