आमदार लक्ष्मण जगताप यांची माहिती
पिंपरी : पिंपरी-चिंचवडवासियांना मोठा दिलासा मिळाला आहे. शास्तीकर पूर्वलक्षी प्रभावाने म्हणजे 2008 पासून माफ करण्यात आला आहे. 1000 हजार स्क्वेअर फुटापर्यंतच्या 71 हजार मिळकत धारकांना याचा फायदा होणार आहे. याबाबतचा निर्णय आज (मंगळवारी) झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. याबाबतची माहिती भाजपचे शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी सभागृह नेते एकनाथ पवार, विधी समिती सभापती माधुरी कुलकर्णी, नगरसेवक विलास मडिगेरी, नामदेव ढाके, तुषार कामठे आदी उपस्थित होते.
71 हजार घरांना होणार फायदा
याबाबत आमदार जगताप म्हणाले की, पिंपरी-चिंचवड शहरातील अवैध बांधकामांना 2008 पासून शास्तीकर लागू झाला. त्याची अंमलबजवाणी महापालिकेने सन 2012 पासून सुरु केली. शहरातील अवैध बांधकामाचा शास्तीकर पूर्वलक्षी प्रभावाने माफ करण्याचा निर्णय यापूर्वीच घेतला होता. मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत त्याच्यावर मोहोर उमटविली आहे. 600 स्क्वेअर फुटापर्यंतच्या घरांना शास्तीकर संपूर्णपणे माफ आहे. 1000 हजार स्क्वेअर फुटापर्यंतच्या 71 हजार निवासी मिळकत धारकांना या निर्णयाचा लाभ होईल यापूर्वी ज्या मिळकत धारकांनी शास्तीकर भरला आहे. त्याचे रुपांतर मिळकतकरामध्ये मध्ये होणार आहे.
आमदार जगताप यांचा पाठपुरावा
एकनाथ पवार म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अतिशय चांगला निर्णय घेतला आहे. शहरवासियांच्यावतीने मी त्यांचे पुणे विमानतळावर भेटून आभार मानले आहेत. विरोधकांनी शास्तीकर माफीच्या वल्गना केल्या. परंतु, भाजपने हा प्रश्न सोडविला आहे. यासाठी आमदार लक्ष्मण जगताप यांनी मोठा पाठपुरावा केला होता. जगतापांनी विरोधकांना षटकार नव्हे तर अष्टकार मारला आहे.
सहा वर्षांपासून शास्तीकराची वसुली
दरम्यान, पिंपरी-चिंचवड शहरात चार लाख 86 हजार 715 मिळकती आहेत. त्यापैकी 3 लाख 13 हजार 85 बांधकामे नियमित आहेत. तर, तब्बल एक लाख 73 हजार 488 बांधकामे अनधिकृत आहेत. या अनधिकृत मिळकतींना 2012 पासून शास्तीकर लागू केला आहे. गेल्या सहा वर्षांपासून पालिकेने 150.12 कोटी रुपयांचा शास्तीकर वसूल केला आहे. तर, 485.23 कोटी शास्तीकराची थकबाकी आहे. 600 हजार चौरस फुटापर्यंतच्या निवासी बांधकामे 32 हजार 774 आहेत. 601 ते 1000 च्या पुढील अवैध बांधकाम शास्तीकर लागू केलेल्या 19 हजार 258 मिळकती आहेत. 1001 च्या पुढील 17 हजार 915 मिळकती, अशा एकूण 69 हजार 947 मिळकती आहेत. तर, बिगर निवासी, मिश्र अशा 8 हजार 916 मिळकती आहेत अशा एकूण 78 हजार 863 मिळकती आहेत.
2012 पासून वसूल झालेली रक्कम
2012-13 मध्ये 3.47 कोटी रुपये शास्तीकर वसूल झाला होता. 2013-14 मध्ये 37.39 कोटी, 2014-15 मध्ये 23.39 कोटी, 2015-16 मध्ये 8.88 कोटी, 2016-17 मध्ये9.59 कोटी, 2017-18 मध्ये 60.62 कोटी आणि 2018-19 या चालू आर्थिक वर्षात मे महिन्यापर्यंत 4.34 कोटी असा 150.12 कोटी शास्तीकर वसूल झाला आहे. 2016-17 मध्ये सर्वाधिक 46 कोटी रुपयांचा शास्तीकर वसूल करण्यात आला आहे.