नागरिकांनो शास्तीकर भरू नका
सर्वपक्षीय गटनेत्यांचे आवाहन
पिंपरी चिंचवड : मुख्यमंत्र्यांनी शास्तीकराबाबत पंधरा दिवसात निर्णय घेण्याचे आश्वासन दिले आहे. गेल्या महापालिकेच्या निवडणुकांपासून तीन ते चार वेळा मुख्यमंत्री आणि स्थानिक पदाधिकार्यांनी शास्तीकर रद्द झाल्याचे देखील जाहीर केले आहे. त्यामुळे शास्तीकर नागरिकांनी भरू नये, असे आवाहन विरोधकांनी केले आहे. शुक्रवारी (दि. 11 रोजी) महापालिकेतील शिवसेना कक्षात सर्वपक्षीय पदाधिकार्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी, महापालिका विरोधी पक्षनेता दत्ता साने, शिवसेना गटनेते राहुल कलाटे, मनसे गटनेते सचिन चिखले, माजी नगरसेवक मारुती भापकर उपस्थित होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पिंपरी चिंचवड शहरात बुधवार दि. 9 रोजी पोलीस आयुक्तालय व पंतप्रधान आवास योजना, स्मार्ट सिटी अंतर्गत फायबर केबल नेटवर्कींग तसेच विविध कामांचे भूमिपूजन झाले. त्यामुळे, रामकृष्ण मोरे सभागृहात बोलताना मुख्यमंत्र्यांनी पुन्हा एकदा शास्तीकराविषयी 15 दिवसात मंत्री मंडळात बैठक घेवून शास्तीची धास्ती दूर केली जाईल, असे आश्वासन दिले. मागील भेटीद्वारे असेच एक आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले होते, शास्ती ठरवण्याचा अधिकारी त्या- त्या महानगरपालिकेत आयुक्तांच्या देखरेखीखाली देण्यात आले आहेत. मात्र, याबाबत काहीही निष्पन्न झालेले नाहीत. त्यामुळे यावेळेसही गाजर देण्याचे काम मुख्यमंत्र्यांनी केल्याचे विरोधकांनी म्हटले आहे.
शास्तीकर माफ मग नोटीसा कशाला? : राहुल कलाटे
हे देखील वाचा
गेल्या वेळेस मुख्यमंत्र्यांनी शास्तीकर माफ केल्याचे जाहीर केले होते. या निर्णयाचे शहरात जोरदार स्वागत झाले होते. परंतु, अद्यापही यावर कुठलाही ठामपणे निर्णय घेण्यात आलेला नाही. महापालिका प्रशासनाकडून आजही नागरिकांना नोटीसा पाठविण्यात येत आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. शास्तीकर माफ केला तर मग नागरिकांना नोटीसा कशाला? असा सवाल शिवसेनेचे राहुल कलाटे यांनी उपस्थित केला आहे. जोपर्यंत शास्तीकराबाबत निर्णय होत नाही, तोपर्यंत नागरिकांनी कर भरू नये, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
निवडणुकांसाठी भाजपाचा फंडा : दत्ता साने
विधानसभा व लोकसभा जवळ आल्यावर आमदार व खासदारांना अनधिकृत बांधकाम, शास्तीकर व रेडझोन यांचे भांडवल करून गाजर दाखविले जाते. परंतु, यातून काहीही निष्पन्न होताना दिसत नाही. शहरात महापालिकेतर्फे शास्तीकर न भरणार्या लोकांना जप्तीच्या नोटीसा देण्यात येत आहेत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी केलेले वक्तव्य फसवं ठरतं की काय ? याविषयी नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. हा आगामी निवडणुकांसाठी भाजपाचा फंडा असून शहराला पुन्हा शास्तीचे गाजर देण्यात आले आहे.
15 दिवसांचे काऊंटडाऊन सुरु : सचिन चिखले
शास्तीकराचा मुद्दा जुना आहे. त्यावर मुख्यमंत्री शहरात घेतलेल्या दोन ते तीन सभांमध्ये शास्तीकर माफ केल्याचे जाहीर केले होते. आता पुन्हा एकदा शास्तीकरासाठी 15 दिवसांची मुदत दिली आहे. मुख्यमंत्र्यांवर कुठलाही भरवसा नसून 15 दिवसांचे काऊंटडाऊन सुरु केले आहे. महापालिका प्रवेशद्वार तसेच शहरातील करसंकलन कार्यालयांसमोर प्रत्येक दिवसाचे काऊंटडाऊन करण्यात येणार आहे. मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या मुदतीत शास्तीकर माफ न केल्यास मुख्यमंत्र्यांचा सत्काराचा कार्यक्रम घेवून मनसे स्टाईलने निषेधार्त आंदोलन करण्यात येणार आहे.
नागरिकांना वेठीस धरु नका : मारुती भापकर
शहरात सद्धा शास्तीकराचा मुद्दा महत्वाचा आहे. याबाबत मुख्यमंत्र्यांकडून अनेक वेळा आश्वासन देण्यात आले आहे. बुधवारी झालेल्या सभेत मुख्यमंत्र्यांनी शास्तीकराचा पुनरुउच्चार केला. तसेच, याविषयावर शिवसेनेचे आमदार अॅड. चाबुकस्वार यांना बोलू देखील दिले नाही. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनावर संशय निर्माण होतो. परंतु, या सर्व प्रकारात नागरिकांना वेठीस धरण्याचे काम सत्ताधारी भाजप करीत आहेत. नागरिकांच्या नळतोडीचे प्रकार सर्रापणे सुरु असून यावर त्वरित निर्णय घेणे आवश्यक आहे.