शास्तीकर वगळून मिळकत कर भरू द्यावा

0
नगरसेवकांनी केली आयुक्तांकडे मागणी
तळवडे : तळवडे भागातील असलेल्या रेड झोन परिसरातील नागरिकांना शास्तीकर वगळून मिळकत कर भरू द्यावा, अशी मागणी विरोधी पक्षनेते दत्ता साने, प्रभाग क्रं. 12 चे नगरसेवक पंकज भालेकर, नगरसेवक प्रवीण भालेकर, नगरसेविका संगीता ताम्हाणे, नगरसेविका पौर्णिमा सोनवणे यांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. रूपीनगर, सहयोगनगर, त्रिवेणीनगर, ताम्हणे वस्ती, गणेशनगर, ज्योतिबानगर सह तळवडे गावठाण परिसराचा देहूरोड दारूगोळा कारखान्याच्या रेड झोन हद्दीमध्ये समावेश करण्यात आला आहे. रेड झोन हद्दीत असलेल्या भागात कोणत्याही प्रकारचे बांधकाम करण्यास महापालिकेच्यावतीने परवानगी दिली जात नाही. तसेच विनापरवाना केलेल्या बांधकामांना महापालिकेच्यावतीने अनधिकृत म्हणून शास्तीकर आकारला जात आहे.
तर कराचा भरणा करतील
तळवडे परिसरामध्ये मध्यमवर्गीय तसेच आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांची संख्या मोठी आहे. यांनी कुटुंबाचा विस्तार झाल्याने गरजेपाटी घरे बांधली आहेत. या भागातील नागरिकांची महापालिकोने आकारलेला मिळकत कर अधिक शास्तीकर भरण्याची आर्थिक क्षमता नाही. तसेच शास्तीकर माफीचा निर्णय शासनस्तरावर प्रलंबित असल्याने या भागातील मिळकतींचा शास्तीकर वगळून मिळकत कर स्वीकारण्याची सुविधा उपलब्ध करून द्यावी. शास्तीकर वगळून मिळकत कर स्वीकारल्यास येथील नागरिक मिळकत कराचा भरणा करतील, असेही या निवेदनात सांगितले आहे.