शास्त्रींच्या सर्वोत्कृष्ट कर्णधारांच्या यादीत गांगुली नाही!

0

नवी दिल्ली : रवी शास्त्री यांनी आपल्या आवडत्या सर्वोत्कृष्ट भारतीय कर्णधारांच्या यादीत माजी कर्णधार सौरव गांगुलीला स्थान दिलेले नाही. अनिल कुंबळे यांची भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदी नियुक्ती झाल्यानंतर शास्त्री आणि गांगुली यांच्यात काहीतरी बिनसल्याची चर्चा होती. त्यानंतर दोघे कधीच एकत्र देखील दिसलेले नाहीत. भारतीय संघाच्या प्रशिक्षक नेमणुकीच्या मुलाखतीसाठी गांगुली अनुपस्थित राहिल्यावर शास्त्री यांनी नाराजी व्यक्त केली होती. रवी शास्त्री यांनी यावेळी महेंद्रसिंग धोनीचे सर्वाधिक कौतुक केले. धोनी आजवरचा सर्वोत्कृष्ट कर्णधार असून त्याची अचूक निर्णय घेण्याची क्षमता लाजवाब आहे, शास्त्री म्हणाले.

धोनीच ‘दादा कॅप्टन’ !
कुंबळे यांच्या निवडीनंतर दोघांनीही विविध कार्यक्रमांत एकमेकांवर टीका देखील केली होती. भारतीय संघाच्या आजवरच्या सर्वोत्कृष्ट कर्णधारांच्या यादीत शास्त्री यांनी धोनीचा उल्लेख मुद्दाम ‘दादा कॅप्टन’ असा केला. खरंतर गांगुली ‘दादा’ या नावाने ओळखला जातो. शास्त्री म्हणाले की, भारतीय संघाचा ‘दादा कॅप्टन’ला माझा सलाम. धोनीने आपल्या कामगिरीने आजवर सर्वांचे मनं जिंकली आहेत. धोनीला आपले श्रेष्ठत्व सिद्ध करून दाखविण्याची गरजच नाही. तो नक्कीच भारतीय संघाचा सर्वात यशस्वी कर्णधार आहे. यशस्वी कर्णधारांच्या यादीत धोनीच्या जवळपास देखील कोणीही नाही.

कपिल देवचे कौतुक
सर्वोत्कृष्ट कर्णधारांच्या यादीत शास्त्री यांनी धोनीसह माजी कर्णधार कपिल देव आणि अजित वाडेकर यांचे नाव घेतले. १९८३ साली भारतीय संघाला विश्वचषक जिंकून देणाऱ्या कपिल देव यांची नेतृत्त्व क्षमता अचाट होती. विश्वचषकासोबतच १९८६ साली इंग्लंडविरुद्धची कसोटी मालिका देखील जिंकू शकलो. तर अजित वाडेकर यांच्या नेतृत्त्वात वेस्ट इंडिजमधील कसोटी मालिकेचा ऐतिहासिक विजय आणि १९७१ साली इंग्लंडविरुद्धचा विजय भारतीय क्रिकेट चाहते कधीच विसरू शकत नाहीत, असे रवी शास्त्री म्हणाले.