पुणे । शास्त्रीय नृत्य व संगीताच्या अमृतांजली फेस्टिव्हल 2018चे आयोजन पुण्यात 15 एप्रिलला करण्यात आले आहे. अमृतांजली महोत्सवाची सुरवात डॉ. शशिकला रवी यांनी सन 2012 मध्ये केली आणि तेव्हापासून तो दरवर्षी येथील अत्याधुनिक अमृतांजली स्टुडिओमध्ये संपन्न होत आला आहे. यंदा या महोत्सवात अनेक नामवंत कलाकार आपले कला-कौशल्य सादर करणार असून विशेषतः संगीत नाटक अकादमी पुरस्कार विजेत्या कलायमामणी गुरु लक्ष्मी विश्वनाथन् आणि गायिका शुभश्री रामचंद्रन आपल्या सहकारीवृंदांसह खास चेन्नईहून येणार आहेत. उल्लेखनीय म्हणजे पुण्यातील अमृतांजली स्कूल ऑफ भरतनाट्यमच्या संस्थापक संचालक डॉ. शशिकला रवी याही प्रारंभीच्या वंदना सत्रात आपला अजोड नृत्याविष्कार सादर करणार आहेत.
वंदना कलाविष्कार, भरतनाट्यम नृत्याविष्कार
रविवार, 15 एप्रिलरोजी सायंकाळी पाच ते आठ यावेळात महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून अमृतांजली स्टुडिओ, 407-409, लुंकड स्कायमॅक्स, दत्त मंदिरासमोर, विमान नगर येथे महोत्सव रंगणार आहे. संस्कृती सीरीजतर्फे भरतनाट्यमवरील पोएट्री ऑफ डान्स या शीर्षकाचा लघुपट, ज्यात गुरु लक्ष्मी विश्वनाथन यांच्या कामगिरीचा परिचय घडवला जाईल आणि त्यांच्या नृत्य प्रवासाबाबत संवादात्मक सत्रही होईल. वंदना कलाविष्कारमध्ये डॉ. शशिकला रवी मुंबईच्या संगीतकारांसह महाराजा स्वाती तिरुनल यांच्या रचना सादर करतील. भरतनाट्यम नृत्याविष्कारात संगीत नाटक अकादमी पुरस्कार विजेत्या कलाईमामणी लक्ष्मी विश्वनाथन चेन्नईतील संगीतकारांच्या साथीने अभिनय मंजरी हा नृत्याविष्कार सादर करतील. यासंदर्भात बोलताना प्रख्यात भरतनाट्यम कलाकार डॉ. शशिकला रवी म्हणाल्या, अमृतांजली फेस्टिव्हल भारताची प्राचीन परंपरा व समृद्ध संस्कृती टिकवण्यासाठी कटिबद्ध आहे. शास्त्रीय नृत्य आणि संगीत या समर्पणाच्या सखोल बैठकी असून त्या एखाद्याला उच्च आध्यात्मिक पातळीवर घेऊन जातात. पाश्चिमात्य संस्कृतीच्या प्रभावामुळे या कला अस्तंगत होणार नाहीत, याची काळजी घेणे आपले कर्तव्य आहे.