पुणे । पावसाळ्याच्या ॠतुतील तानसेनावर बांधलेली मल्हार रागातील बंदिश…संत सोयराबाईंची प्रचलित रचना अवघा रंग एक झाला… आणि विविध रागांतील मनोहारी बंदीशी व रचनांच्या सादरीकरणाने रसिक मंत्रमुग्ध झाले. शास्त्रीय आणि भक्तीगीतांतून प्रख्यात गायिका आरती अंकलीकर-टिकेकर यांनी पुणेकरांची मने जिंकली. एकाहून एक सरस रचना व गीतांच्या सादरीकरणातून मंचावर स्वरमल्हार बरसल्याचा अनुभव उपस्थितांनी घेतला.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळतर्फे ट्रस्टच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी (125) वर्षानिमित्त गणेश कला क्रीडा मंच येथे सांस्कृतिक महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये शास्त्रीय गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. पुराया धनाश्री रागातील झपतालात असलेल्या पार करो आरज सुनो.. या बंदिशीने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविले. तराणा आणि दृत तीनतालातील पायलिया झनकारे मोरी… या बंदिशीला श्रोत्यांनी भरभरून दाद दिली. ताने स्वर रंगवावा… हे संत रामदासांचे पद सादर होताच रसिक भक्तीरसात न्हाहून निघाले. शास्त्रीय आणि उपशास्त्रीय संगीतासह भक्तीगीतांच्या सादरीकरणाने स्वरमैफलीत उत्तरोत्तर रंग भरत गेला.
किशोरीताईंच्या आठवणींना उजाळा
कार्यक्रमाच्या उत्तरार्धात पुणेकरांची फर्माईश पूर्ण करीत मी राधिका, मी प्रेमिका… चा स्वर टिपेला गेला आणि सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला. किशोरीताई आमोणकर यांच्या आठवणी यावेळी आरती अंकलीकर-टिकेकर यांनी आपल्या गायनातून जाग्या केल्या. रोहित मराठे (हार्मोनियम), विभव खांडोळकर (तबला), गणेश पापळ (पखवाज), स्वरुपा बर्वे व जाई सोवनी (तानपुरा व गायन), आदित्य आपटे (तालवाद्य) यांनी सुरेख साथसंगत केली.