शास्त्रीय संगीतातील एकरूप झालेली गानसंध्या

0

पुणे । शास्त्रीय संगीताच्या निर्मळ स्वरांमध्ये एकरूप झालेल्या गानसंध्येची रसिकांनी अनुभूती घेतली. कसदार गायकी आणि त्याला लाभलेली तबल्याची तडफदार साथ अशा सुरेल मिलाफातून मैफलीला अनोखा रंग चढला. प्रख्यात गायक पं. राशीद खान यांच्या सुरेल गायकीने सजलेल्या शास्त्रीय संगीत मैफलीत दंग झाले. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ तर्फे ट्रस्टच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सव वर्षानिमित्त गणेश कला क्रीडा मंच येथे सांस्कृतिक महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये शास्त्रीय गायन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

मैफलीत पं.राशीद खान यांनी सादर केलेल्या ‘अब तो रुत मान… पायलिया झनकार मोरी…’ या बंदिशींनी रसिकांची दाद मिळविली. ‘करम कर दिजे… बात बनावत… साजन मोरे घर आये…’ या बंदिशींना रसिकांनी भरभरून दाद दिली. ‘बहुत दिन बिते पिया नाही आये…’ या बंदिशीने रसिकांची मने जिंकली. ‘का करू सजनी आये ना बालम…’ या बंदिशीने रसिक मंत्रमुग्ध झाले. अजय जोगळेकर (हार्मिनिअम), पं.विजय घाटे (तबला), नागेश आडगावकर, निखिल जोशी (तानपुरा) यांनी साथसंगत केली.