शास्त्रीशी चर्चा करून बीसीसीआयचा निर्णय

0

नवी दिल्ली । भारतीय क्रिकेट संघाच्या सहयोगी स्टाफच्या नेमणुकीवरून तयार झालेले वादळ अजून शमलेले नाही. सहयोगी स्टाफच्या नेमणुकी संदर्भात तोडगा काढण्यासाठी संघाचे नवीन मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री सर्वोच्च न्यायालयाने नेमलेल्या व्यवस्थापन समितीची (सीओए) भेट घेणार आहे. शास्त्री सध्या परदेशात असून ते आल्यावर मंगळवार ही बैठक होणार आहे. या बैठकित बीसीसीआयचे कार्यकारी प्रमुख सी. के. खन्ना, सचिव अमिताभ चौधरी, मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जोहरी आणि व्यवस्थापन समितीचे प्रमुख विनोद राय सहभागी होणार आहेत. व्यवस्थापन समितीने अद्याप गोलंदाजीचा सल्लागार झहीर खान आणि परदेश दौर्‍यासाठी फलंदाजीचा सल्लागार राहुल द्रविड यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलेले नाही. तर संजय बांगर आणि आर. श्रीधर यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलेले आहे.

संघ व्यवस्थापकासाठी जाहिरात
एरवी भारतीय संघाच्या व्यवस्थापकपदी मर्जीतल्या पदाधिकार्‍याची वर्णी लागायची. पण यावेळी त्यासाठी अर्ज मागवण्याचा निर्णय व्यवस्थापन समितीने घेत त्यासाठी लगेचच जाहिरातही देण्यात आली. याशिवाय भारत अ आणि 19 वषार्ंखालील संघाच्या व्यवस्थापकांसाठी जाहिरात देण्याचा निर्णय व्यवस्थापन समितीने घेतला. वरिष्ठ संघाच्या व्यवस्थापकासाठी माजी क्रिकेटपटूंना प्राधान्य दिले जाणार आहे. या पदासाठी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख 21 जुलै आहे. दिल्लीत 22 जुलै रोजी होणार्‍या बैठकीत व्यवस्थापकाची निवड होणार आहे.

हा तर द्रविड आणि झहीरचा अपमान
राहुल द्रविड आणि झहीर खान या दोघांचा बीसीसीआयने सार्वजनिकरीत्या अपमानीत केल्याचा आरोप रामचंद्र गुहा यांनी केला आहे. रामचंद्र गुहा सर्वोच्च न्यायालयाद्वारे नियुक्त केलेल्या क्रिकेट प्रशासकीय समितीचे माजी सदस्य आहेत. त्यांनी हा आरोप केल्याने क्रिकेट वर्तुळात खळबळ उडाली आहे. भारतीय क्रिकेट संघाच्या परदेश दौर्‍यासाठी राहुल द्रविडची फलंदाजी प्रशिक्षक म्हणून तर झहीर खानची गोलंदाजी प्रशिक्षण म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. मात्र द्रविड आणि झहीरची नियुक्ती थांबवण्यात आल्याने हा त्यांचा सार्वजनिकरीत्या अपमान आहे असे ट्वीट यांनी गुहा यांनी केले आहे.

14 जणांचा सहयोगी स्टाफ
भारतीय संघात फलंदाजी, गोलंदाजी, क्षेत्ररक्षण, मसाज एक्स्पर्ट, थ्रो डाऊनसाठी असा एकूण 14 जणांचा सहयोगी स्टाफ आहे. यातील काही जुन्या चेहर्‍यांना काढून त्यांच्या जागेवर शास्त्रींच्या मर्जीतल्या व्यक्तींची निवड होऊ शकते. या 14 जणांव्यतिरिक्त गोलंदाजीचे प्रशिक्षक म्हणून भरत अरुण यांची नेमणुक जवळ जवळ निश्‍चित समजली जात आहे. सध्या संघाला झहीर खानची गरज नाही, आवश्यकता भासल्यास त्याला बोलवू असा पवित्रा शास्त्री यांनी घेतला आहे. याशिवाय मुख्य संघासोबत जुळवून घेण्यास स्वत: राहुल द्रविडच तयार नसल्याचे सांगण्यात येत आहे.

सलग दोन दिवस बैठका
व्यवस्थापन समितीचे तीन सदस्य मंगळवारी एक बैठक करणार आहेत. त्यात काही अधिकृत घोषणा करण्याआधी झहीर खान आणि राहुल द्रविड यांच्या भारतीय संघासोबतच्या कराराबाबत चर्चा होईल. या चर्चेनंतरच अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे. त्यानंतर हे तीन सदस्य 19 जुलैला ही बैठक करणार आहेत. त्यात भारतीय संघाच्या सहयोगी स्टाफचे करार आणि राहुल द्रविडचे आयपीएलमधील संघासोबत असलेला करार आणि त्यामुळे निर्माण होणार्‍या परस्पर हितसंबधांच्या मुद्द्यावर चर्चा होण्याची शक्यता आहे.