शास्त्री गुरुजींची आता सचिनसाठी बॅटिंग

0

नवी दिल्ली । भारतीय संघाच्या गोलंदाजीच्या प्रशिक्षकासाठी भारत अरुण यांच्यासाठी जोरदार लॉबिंग करणार्‍या संघाचे नवीन प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी आता फलंदाजासाठी सल्लागार म्हणून सचिन तेंडुलकरच्या नावाचा आग्रह धरला आहे. परस्पर हितसबंधाचा मुद्दा आड येत नसेल, तर फलंदाजांसाठी सल्लागार म्हणून सचिनची सेवा पाहिजे असल्याचे रवी शास्त्री यांनी बीसीसीआयच्या विशेष समितीला सांगितले आहे. या बैठकीसाठी कार्यकारी अध्यक्ष सी. के. खन्ना, मुख्यकार्यकारी अधिकारी राहुल जौहरी, कार्यकारी सचिव अमिताभ चौधरी आणि प्रशासकीय समितीच्या सदस्या डायना एडलजी हजर होत्या. भारतीय संघाचा प्रशिक्षक नेमण्यासाठी प्रशासकिय समितीने नेमलेल्या क्रिकेट सल्लागार समितीत सौरव गांगुली, व्ही. व्ही. एस लक्ष्मण आणि सचिन तेंडुलकरचाही समावेश होता.

या समितीने सहयोगी स्टाफमध्ये गोलंदाजांसाठी झहीर खान आणि फलंदाजांसाठी राहुल द्रविडची सल्लागार म्हणून शिफारस केली होती. पण रवी शास्त्री यांनी सहयोगी स्टाफ आपल्या मर्जीतला असावा असा पवित्रा घेत क्रिकेट सल्लागार समितीने केलेल्या नावांची शिफारस डावलून गोलंदाजीसाठी अरुण भारत यांची निवड केली होती. राहुल द्रविड सुरुवातीपासूनच ही जबाबदारी स्वीकारण्यास तयार नव्हता, असे बोलले जाते.

सचिनला आयपीएलवर पाणी सोडावे लागेल
समितीतील एका पदाधिकार्‍याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, रवी शास्त्रीने काही दिवसांसाठी सचिन तेंडुलकरला फलंदाजांसाठी सल्लागार नेमावा असा प्रस्ताव ठेवला आहे. त्यावेळी शास्त्रीला परस्पर हितसंबधाच्या नियमाची आठवण करुन देण्यात आली. सचिनने ही जबाबदारी स्विकारल्यास त्याला आयपीएलसहित अन्य जबाबदार्‍या सोडाव्या लागतील.