शाहरुख खान थोडक्यात बचावला

0

मुंबई । अभिनेता शाहरुख खानला त्याच्या आगामी चित्रपटाच्या सेटवर अपघात झाल्याची घटना घडली आहे. आनंद एल. राय यांच्या चित्रपटाच्या सेटवर चित्रीकरणादरम्यान झालेल्या या गंभीर स्वरुपाच्या अपघातामध्ये दोन क्रू मेंबर्स जखमी झाले आहेत. दरम्यान, शाहरुख या अपघातातून थोडक्यात बचावला आहे.

शाहरुख सेटवर असतानाच सेटच्या सिलिंगचा काही भाग कोसळला. त्यानंतर सेटवर गोंधळाचं वातावरणही निर्माण झालं होतं. या अपघातामध्ये दोन क्रू मेंबर्स जखमी झाले असून त्यांना नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, अभिनेता शाहरुख खान या अपघातून बचावला असून त्याला कोणतीही गंभीर दुखापत झालेली नाही. अपघातानंतर तातडीने चित्रीकरण थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

चित्रनगरीमध्ये उभारण्यात आलेल्या सेटवर हा अपघात झाल्याचे म्हटले जात आहे. ज्या भागात सिलिंग कोसळले त्याच्याविरुद्ध दिशेला शाहरुख बसला होता. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रुग्णालयात दाखल केलेल्या क्रू मेंबर्सना आता डिस्चार्ज देण्यात आला असून, दोन दिवसांसाठी चित्रीकरण बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याआधीही बर्‍याचदा शाहरुखला काही चित्रपटांच्या सेटवर अपघात झाला आहे. डर, रा.वन, चेन्नई एक्सप्रेस या चित्रपटांच्या सेटवरही शाहरुखला दुखापत झाली होती. पण, सध्यातरी शाहरुखला कोणतीही दुखापत झाली नसून तो सुखरुप आहे. त्यामुळे अनेकांनीच सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.