नवी दिल्ली । पाकिस्तानचा क्रिकेट संचा आक्रमक खेळाडू शाहिद आफ्रिदी एरवी वादाच्या भोवर्यात अडकलेला दिसून येतो. मात्र भारताच्या काही खेळाडूंसोबत त्याचे चांगले संबंध आहेत. पाक क्रिकेट बोर्डाने ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या ट्वेन्टी-20 मालिकेसाठी संघात स्थान न दिल्यानंतर शाहिद आफ्रिदीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. आफ्रिदीने जागतिक क्रिकेटमध्ये दिलेल्या योगदानाचा सन्मान म्हणून भारतीय संघानेही पुढाकार घेऊन त्याला संघातील खेळाडूंची स्वाक्षरी असलेले टी-शर्ट भेट म्हणून दिले. विराट कोहलीच्या 18 नंबरची जर्सी असलेल्या टी-शर्टवर या स्वाक्षर्या करण्यात आल्या आहेत.
20 वर्षांचे क्रिकेट करिअर : निवृत्तीच्या घोषणेनंतर शाहिदच्या 20 वर्षांचे क्रिकेट करिअर संपुष्टात आले. आफ्रिदीने आपल्या क्रिकेट करिअरमध्ये अनेक विक्रमांना गवसणी घातली. आपल्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केली. पाकचा संघ भारताचा पारंपारिक प्रतिस्पर्धी असला तरी आफ्रिदीचे भारताच्या काही खेळाडूंसोबत चांगले संबंध आहेत. फटकेबाजीत हातखंडा असलेल्या आफ्रिदीला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ‘बुम-बुम आफ्रिदी’ असे ओळखले जाते. आफ्रिदीने पाकिस्तानकडून खेळताना वनडे क्रिकेटमध्ये 8064 धावा ठोकल्या असून त्याच्या नावावर 395 विकेट्स देखील जमा आहेत. ट्वेन्टी-20 मध्ये आफ्रिदीने 98 सामन्यांत 1405 धावा जमा आहेत. तर 97 विकेट्स देखील घेतल्या आहेत.
संघातील सर्व खेळाडूंच्या सह्या
शाहिद आफ्रिदीने निवृत्ती घेतल्यानंतर टीम इंडियाने कर्णधार विराट कोहलीची जर्सी त्याला भेट दिली आहे. इतकंच नाही तर या जर्सीवर टीम इंडियाच्या खेळाडूंची स्वाक्षरी आहे. तुमच्यासोबत खेळणं हा नेहमीच सर्वोत्तम अनुभव होता, असं विराटच्या जर्सीवर लिहिलेलं आहे. या जर्सीवर कोहलीसोबत, युवराज सिंह, आशीष नेहरा, जसप्रीत बुमरा, सुरेश रैना, पवन नेगी, मोहम्मद शमी, रवींद्र जाडेजा, भुवनेश्वर कुमार, अजिंक्य रहाणे, शिखर धवन, रविचंद्रन अश्विन, हार्दिक पांड्या आणि टीम इंडियाचे माजी संचालक रवी शास्त्री यांची सही आहे. एका पाकिस्तानी पत्रकाराने हा फोटो ट्विटरवर शेअर केला आहे. गेल्यावर्षी जेव्हा ईडन गार्डन्स मैदानावर भारत – पाकिस्तान सामना पार पडला होता. त्यावेळी विराट कोहलीने पाकिस्तानी गोलंदाज मोहम्मद आमीरला आपली बॅट गिफ्ट केली होती.
कोहलीने लिहिला संदेश
खुद्द विराटने या जर्सीवर आफ्रिदीसाठी एक शुभेच्छा संदेश देखील लिहीला आहे. तुझ्या विरुद्ध खेळणे ही माझ्यासाठी नेहमी सन्मानाची गोष्ट होती., असे विराटने टी-शर्टवर लिहिले आहे. शाहिद आफ्रिदीला निरोप देताना भारतीय संघाने घेतलेल्या या पुढाकारामुळे प्रतिस्पर्धी संघांमध्ये असलेले शत्रुत्व हे केवळ खेळपट्टीच्या 22 यार्डापुरतेच मर्यादित असल्याचे दाखवून दिले आहे. मैदानाबाहेर दोन्ही संघांच्या खेळाडूंमध्ये सौदार्हाचे संबंध असल्याचे उदाहरण भारतीय संघाने दिले आहे. या आधीही टीम इंडियाने विदेशी खेळाडूंना अशी भेट दिली आहे.