शाहीद खकान अब्बासी पाकचे तात्पुरते पंतप्रधान!

0

इस्लामाबाद : भ्रष्टाचार व काळा पैसा पांढरा केल्याप्रकरणी दोषी ठरविल्यानंतर नवाझ शरीफ हे पंतप्रधानपदावरून पायउतार झाले आहेत. त्यांच्या जागी पेट्रोलियम व नैसर्गिक संसाधनमंत्री शाहीद खकान अब्बासी यांनी पाकिस्तानचे तात्पुरते पंतप्रधान बनविले जाणार आहे. पाकिस्तानी प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधानपदी नवाझ यांचे बंधू शाहबाज शरीफ यांची निवड केली जाणार आहे. तथापि, ते खासदार नसल्याने त्यांना खासदार म्हणून निवडून आणावे लागणार आहे. तोपर्यंत या पदावर शाहीद अब्बासी यांची निवड केली जाईल.

पक्षातील ज्येष्ठ नेत्यांच्या नावांचीही चर्चा
पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने भ्रष्टाचारप्रकरणी पाकिस्तानचे तीनवेळा पंतप्रधान राहिलेले नवाझ शरीफ यांना दोषी ठरवलेले आहे. तसेच, त्यांना पंतप्रधानपदावर अपात्रही घोषित केलेले आहे. शरीफ यांच्यासह त्यांची मुलगी व जावई यांनाही न्यायालयाने दोषी ठरवलेले आहे. त्यामुळे शरीफ कुटुंबीयांविरुद्ध आता भ्रष्टाचार व काळा पैसाप्रकरणी कायदेशीर कारवाई सुरु होणार आहे. त्यामुळे शरीफ यांना पदावरून दूर व्हावे लागले. शरीफ यांच्या पाकिस्तान मुस्लीम लीग (नवाझ) या पक्षाकडे बहुमत असल्याने त्यांच्याच पक्षाचा पंतप्रधान होईल. त्यासाठी गृहमंत्री चौधरी निसार, संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ, पेट्रोलियम व नैसर्गिक संसाधनमंत्री शाहीद खकान अब्बासी, वरिष्ठ सभागृहाच्या सभापती सरदार अयाज सादिक आणि नवाझ यांचे छोटेबंधू व पंजाब प्रांताचे मुख्यमंत्री शाहबाज शरीफ यांची नावे चर्चेत आहेत. पैकी, शाहबाज हे सद्या लोकसभेचे सदस्य नाहीत. त्यामुळे त्यांना पहिल्यांदा खासदार म्हणून निवडून यावे लागणार आहे.

पाकिस्तानात संमिश्र प्रतिक्रिया
नवाझ शरीफ पायउतार झाल्यानंतर इमराऩ खान व त्यांच्या तहरीक-ए-पाकिस्तान या पक्षाला आनंद झालेला आहे. इमरान यांनी ट्वीट करून पाकिस्तानातील गॉड फादर युगाचा अंत झाल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली. तर माजी सूचना व प्रसारणमंत्री मरियम औरंगजेब यांनी सांगितले, की नवाझ शरीफ हे लवकरच चौथ्यांदा पाकिस्तानचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतील. नवाझ यांच्या कन्या मरियम शरीफ यांनी न्यायालयाच्या निर्णयाबद्दल मात्र तीव्र नापसंती व्यक्त केली. यापूर्वीही जेव्हा जेव्हा नवाझ यांना अशाप्रकारे सत्तेवरून दूर केले गेले, तेव्हा तेव्हा ते मोठ्या जनमताने सत्तेवर आलेले आहेत, असे त्यांनी सांगितले.