मागच्या 15 दिवसांपूर्वी लातूरच्या शीतल वायाळ नावाच्या मुलीने बापाला लग्नात हुंडा द्यावा लागणार या चिंतेत आत्महत्या केली. अर्थातच अशा अनेक ‘शीतल’ आजवर हुंड्यासाठीच्या छळाने, जाचाने आत्महत्या करून घेऊन मुक्त झाल्या आहेत. खरंतर हुंडा मागणार्या आणि हुंड्याला प्रतिष्ठा समजणार्या लोकांना त्यांच्या कुजक्या पारंपरिक विचारांपासून मुक्त करायला पाहिजे. एकीकडे शीतलसारख्या मुली लग्नाआधीच हुंड्याच्या चिंतेने मरताहेत तर लग्न झाल्यानंतरदेखील ’विवाहितेचा हुंड्यासाठी छळ’ या मथळ्याखाली रोज एखादी तरी बातमी वाचायला मिळतेय, तर दुसरीकडे लोकांचे प्रतिनिधी असलेले काही पुढारी शाही विवाहाच्या नावावर कोट्यवधी रुपयांची उधळण करताना दिसत आहेत. हा विरोधाभास आपल्या तथाकथित पुरोगामी म्हणून मिरवणार्या आणि छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारख्या विचारांचा मोठा वारसा असणार्या महाराष्ट्रात आहे हे दुर्दैवच म्हणावे लागेल.
शीतल वायाळने आत्महत्या केली त्यावेळी तिने लिहिलेली चिठ्ठी अशा शाही विवाहाच्या ठिकाणी प्लेक्स करून लावायला हवी. त्यातील काही वाक्य संपत्तीचे प्रदर्शन करणार्यांनी निश्चित लक्षात घ्यावी. ती वाक्य अशी- ’शेतात सलग पाच वर्षे नापिकीमुळे आमच्या कुटुंबाची परिस्थिती अत्यंत नाजूक आणि हलाखीची झाली आहे. माझ्या दोन बहिणींची लग्न छोटेखानी पद्धतीने करण्यात आली. पण माझं लग्न करण्यासाठी दोन वर्षांपासून बापाची दरिद्री संपत नव्हती. कुठल्याही बँकेचं किंवा सावकाराचं कर्ज माझ्या बापाला न मिळाल्याने दोन वर्षांपासून माझं लग्न खोळंबलं होतं. त्यामुळे मी माझ्या बापावरील वजन कमी करण्यासाठी आणि मराठा समाजातील रुढी, परंपरा, देवाणघेवाण कमी करण्यासाठी स्वखुशीने आत्महत्या करत आहे.’ शीतलच्या आधी महिनाभर मोहिनी भिसे नावाच्या एका मुलीने अशाच प्रकारे चिठ्ठी लिहून हुंड्याच्या आणि लग्नाच्या चिंतेत मृत्यूला कवटाळले होते. खरंतर आत्महत्या हा कुठल्याही समस्येवर उपाय नाहीच. मात्र, ही परिस्थिती नावाची गोष्ट या संवेदनशील लेकींना जगण्याचे सारे दरवाजे बंद करून टाकणारी आहे. डोक्यावर वाढलेले कर्ज, नापिकी आणि उपवर झालेल्या मुलीच्या लग्नाच्या चिंतेत कित्येक बापांनी गळफास घेतले असतील. पोरींची लग्न झाल्यावरदेखील मानापमान आणि इज्जतीसाठी स्वतःच्या अंगावर फाटकी कपडे घालून फिरणारे अनेक बाप पाहायला मिळतात. बापाच्या रोज मरणाचे दृश्य या पोरी सहन करू न शकल्याने त्यांनी या व्यवस्थेलाच अलविदा केला. तिचे अलविदा करणे खरंतर त्या व्यवस्थेवर जोरदार चपराक ठरली. याच मराठवाड्यात मागच्या महिन्यात भाजपच्या अध्यक्षांच्या आमदार मुलाचे शुभमंगल झाले. जोरदार वाजवून लग्न केले गेले. राज्यात कर्जबाजारी शेतकर्यांच्या आत्महत्यांचा झालेला उद्रेक, लग्नासाठी पैसे नसल्याने गोरगरीब शेतकर्यांच्या मुली करत असलेल्या आत्महत्या, सर्वदूर दुष्काळामुळे हतबल झालेला शेतकरी अन् कर्जमाफी देण्यावरून सुरू असलेला सत्ताधारी भाजप सरकारचा चालढकलपणा यामुळे सर्वत्र संतापाचे वातावरण असतानाच, भाजपचे खासदार तथा उद्योगपती संजय काकडे यांनी त्यांच्या कन्येचा म्हाळुंगेतील बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलात अगदी शाही विवाह सोहळा पार पाडला. या सोहळ्याचे वैभव पाहून अनेकांचे डोळे दिपले. खा. काकडे यांची कन्या कोमल व ना. देशमुखांचे चिरंजीव रोहन यांच्या या शाही विवाहाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अख्खे मंत्रिमंडळ व राज्यातील दिग्गजांची हजेरी लाभली होती. शाही विवाहावरून टीका सुरू होताच, राज्यातील गरजू मुलांना शिक्षणासाठी एक कोटींची मदत देणार असल्याची घोषणा खा. काकडे यांनी करून विरोधाची धार बोथट करण्याचा प्रयत्न केला. गेल्या महिन्यात चिंचवड येथे भाजप प्रदेश कार्यकारिणीच्या झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पदाधिकारी व लोकप्रतिनिधींना पक्षात व्हीआयपी संस्कृती आणू नका. काँग्रेस-राष्ट्रवादीसारखे वागू नका, बडेजाव मिरवणे टाळा. सामान्यांशी नाळ जुळवून ठेवा, असे बजावले होते. बजावणारे खुद्द मुख्यमंत्री या सोहळ्याला उपस्थित होते.
ना. सुभाष देशमुख यांच्यातर्फे घेतला जाणारा सामुदायिक विवाह सोहळा एक आदर्श उपक्रम समजला जातो. सोलापूर, उस्मानाबाद जिल्ह्यात त्यांचा ’लोकमंगल’ समूहाने मोठ्या प्रमाणावर सामूहिक विवाहाची चळवळ व्यापक केली आहे. आजवर हजारो विवाह या अंतर्गत झालेत. नियोजनबद्ध असलेल्या या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होतेय. मात्र स्वताच्या मुलाच्या लग्नाच्या वेळी त्यांच्यातील उपक्रमशील माणूस नेमका गेला कुठे? हा सवाल चिंतनीय आहे, तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे आ. राहुल जगताप यांनी सामुदायिक विवाह सोहळ्यात लग्न करून आदर्श घालून दिला. असो, आपल्याला राजकीय उणे-दुण्याशी देणे-घेणे नाही. आ. जगताप यांचे आमदार म्हणून नव्हे, तर एक माणूस म्हणून तरी कौतुक व्हायलाच हवं. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी देखील आपल्या अमाप संपत्तीचे ओंगळवाणे प्रदर्शन केलेच आहे. यावरून दुष्काळात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी नेत्यांना झापून देखील काढले तर काहींना पक्षातून देखील बाहेर काढले आहे. अर्थात कुठल्याही पक्षाच्या नेत्यांकडून अशा ओंगळवाण्या प्रदर्शनाची अपेक्षा आपण करू शकत नाहीत. कारण ते लोकप्रतिनिधी असतात, त्यांना फॉलो करणारे सामान्य लोक मोठ्या प्रमाणावर असल्याने त्यांच्याकडून काहीतरी आदर्श व्हावं अशी अपेक्षा असते, मात्र इथे असे होताना दिसत नाही.
शाही विवाह करून संपत्तीचे प्रदर्शन करणार्यांनी सामान्य शेतकरी-कष्टकरी वर्गातील पोरीच्या बापाच्या लग्नाची गोष्ट निश्चित समजावून घ्यावी. कारण पोरीचे लग्न जमल्यापासून ते लग्न झाल्यावर प्रत्येक सणासुदीला परंपरेच्या नावाखाली स्वताचा जीव जाळून खर्च करावा लागतो. त्यातही कुणाच्या मानापमानात कसूर राहू नये यासाठी प्रत्येक वेळी धास्तीत जीवन जगात असतो. हे पूर्वापारपासून चालत आलेलं आहे. आजही ग्रामीण भागात हे प्रमाण आढळतेच. यासाठी परिवर्तनशील उपक्रम राबविणे गरजेचे आहे. प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष परिवर्तनच सामान्य बापाच्या व्यथा थांबवू शकतो. लग्न करताना मुलींनी खरतर मी हुंडा देऊ देणार नाही असे ठाम मत बनवावे तर मुलांनी मी हुंडा घेणार नाही अशी शपथ घ्यायला हवी. मुलीचे लग्न करताना आणि झाल्यावर बापाची परवड न पाहण्याजोगी असते. मात्र, पोरगी सुखात राहावी या एका वाक्यासाठी त्या बापमाणसाचा संघर्ष सुरु असतो. मुलीचा जन्म झाल्या-झाल्या तिच्या शिक्षणाचा विचार न करता तिच्या वयाच्या 18 वर्षे पूर्ण होईस्तोवर तिच्या लग्नाच्या पैशाची चिंता करणारी अनेक लोकं इथ आहेत. आश्चर्य सुशिक्षित लोकांचं वाटत. मुलीच्या लग्नासाठी लाख-दोन लाखांच्या कर्जापायी बाप मरतोय. बाप मरतोय हे पाहून लेकी मरताहेत आणि दुसरीकडे कोट्यवधींची उधळण करत होणारी ही शाही लग्ने आज छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर या विचारांना धुळीस मिळवताहेत, हे नक्की. खरंतर लग्न म्हणजे दोन जीवांचे मिलन. ते शाही असो अथवा साधे काही विशेष फरक पडत नाहीच. मात्र, केवळ प्रसिद्धी आणि प्रतिष्ठेपायी सगळी नैतिकता धुळीस मिरवणार्या या शाही लोकांच्या नावानं चांगभलं…!
निलेश झालटे