जळगाव । शाहुनगरातील दक्षिण मुखी प्राचीन तपस्वी हनुमान मंदिरातील पुजार्याची मंदिरासमोर उभी असलेली मोपेड मोटारसायकल अज्ञात व्यक्तींनी मध्यरात्री जाळून टाकल्याची घटना मंगळवारी सकाळी 5 वाजेच्या सुमारास उघडकीस आली. दरम्यान, सोमवारी मध्यरात्री 2 ते 3 वाजेच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने पेट्रोल टाकून मोटारसायकल जाळून टाकल्याचा संशय वर्तविण्यात येत आहे. यापूर्वी तीन ते चार महिन्यांपूर्वी शाहुनगरात कारवर दगडफेकून काचा फोडल्याचे प्रकार घडले होते.
तीन महिन्यांपूर्वीही झाली दगडफेक
गेल्या तीन ते चार महिन्यांपूर्वी मंदिरांच्या वरतील छतावर महाराज व पुजारी झापलेले असतांना काही तरूणांकडून त्यांच्यावर मध्यरात्री दगडफेक करण्यात आली होती. परंतू दगडफेकर करणार्या तरूणाला रात्री नागरिकांनी पकडून चांगलाच चोप दिला होता. तर महिन्याभरापूर्वी देखील काही मद्यपींनी काहीही कारण नसतांना पुजार्यांशी वाद घालून त्यांना शिवीगाळ केल्याचा प्रकारही झाला होता, अशी माहिती पुजारी रामबालकदास यांनी यांनी सांगितले. तर नेहमीच पुजार्यांवर हल्ले करण्यात येत असून त्यामुळे या हल्लेखोरांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी पुजारी रामबालकदास यांनी केली.
पुजारी निमखेडी येथील गोशाळेतून आल्यानंतर उघडकीस आली घटना
मुळचे राजस्थान राज्यातील घोडास गावातील रहिवासी रामबालकदास सरजुदास त्यागी (वय-27) हे गेल्या सन 2004 पासून शाहुनगरातील तपस्वी हनुमान मंदिरात पुजारी आहेत तर जवळच असलेल्या गोशाळेचे देखभाल करतात. तर मंदिराच्या ट्रस्टतर्फे बांधण्यात आलेली निमखेडी येथील गोशाळेची देखील देखभाल रामबालकदास हे करतात. दरम्यान, सोमवारी रात्री 10.30 वाजेच्या सुमारास पुजारी रामबालकदास हे निमखेडी शिवारातील गोशाळेतून गाईंचे दूध घेऊन मोपेड मोटारसायकल (एमएच.19.सीजी.2214) ने शाहुनगरातील मंदिरात आले. यानंतर बाजुलाच असलेल्या व्यायाम शाळेला मोटारसायकल उभी करून घरात गेले. परंतू गायीला वासरू होणार असल्याने रामबालकदास हे पुन्हा त्यांच्या घोड्यावर बसून रात्री निमखेडी येथील गोशाळेसाठी निघून गेले. त्याच दरम्यान, मध्यरात्री 2 ते 3 वाजेच्या सुमारास अज्ञात व्यक्तींनी व्यायाम शाळेजवळ उभी असलेली दुचाकी जाळून टाकली. मंगळवारी पहाटे 5 वाजेच्या सुमारास रामबालकदास हे निमखेडी येथून घरी शाहूनगरात पोहाचताच त्यांना त्यांची मोपेड मोटारसायकल (एमएच.19.सीजी.2214) ही जळून खाक झाल्याची दिसून आली. त्यांनी लागलीच मंदिरातील अन्य पुजारींना घटनेची माहिती दिली आणि घरा शेजारी राहणारे भगवान वारूळकर यांना विचारपूस केली असता त्यांनी घटनेबाबत काहीही माहिती नसल्याचे सांगितले. रामबालकदास यांनी लागलीच शहर पोलिस स्टेशन गाठत अज्ञात व्यक्तीने 30 हजार रुपये किंमतीची मोटारसायकल जाळून नुकसान केल्याप्रकरणी तक्रार दिली. त्यावरून शहर पोलिसात अज्ञात व्यक्तीविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.