जळगाव । शहरातील शाहूनगरात एकाच रात्री चार ठिकाणी अज्ञात चोरट्यांनी घरफोड्या करत नऊ मोबाईलसह 61 हजार 700 रुपयांची रोकडे चोरून नेल्याची घटना आज मंगळवारी सकाळी उघडकीस आली आहे. चोरट्यांनी शाहुनगरात चक्क शंभर-शंभर मिटर अंतरावर घरात कुटूंबिय झोपलेले असतांना चोर्या केल्या आहेत. शहरात एकाच रात्री चार घरफोड्या झाल्यामुळे नागरिकांत दहशत निर्माण झाली आहे़ चोरट्यांनी शहर व जिल्हा पेठ पोलिस हद्दीत ठरावीक वेळेनंतर घरफोडी झाल्यामुळे ही टोळी पकडण्यासाठी पोलिसांसमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे़ शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन घरफोड्या झाल्या आहे, तर जिल्हा पेठ पोलीस हद्दीत दोन घरफोडी झाली आहे. त्यातच चार घरफोड्या झाल्यामुळे शाहूनगरात भितीचे वातावरण पसरले असून पोलीस गस्त वाढवावी, अशी मागणी नागरीकांनी केली जात आहे.
कुटूंबिय झापलेले असताना चोरी
शाहुनगरात अकबर मेहमुद बागवान (वय-60) हे कुटूंबियांसोबत राहतात. तर बागवान हे शेतकरी आहेत. बागवान यांचे शाहुनगरातच नवीन घरबांधकाम सुरू असल्याने ते बांधकाम सुरू असलेल्या घरासमोरच राहत आहेत. परंतू मुलगा सलीम व मुस्तफा हे पत्नी व मुलांसोबत बांधकाम सुरू असलेल्या घरात झोपायला जायचे. सोमवारी रात्री सलीम हा नेहमी प्रमाणे पत्नी व मुलांसोबत नवीन घरात झोपण्यासाठी गेला. यानंतर मुस्तफा हे दफनविधीच्या कार्यक्रमाला सोनगढ येथे गेला असल्याने रात्री घरी उशिरा येवून नवीन बांधकाम सुरू असलेल्या घराच्या दुसर्या मजल्यावरील खोलीत झोपण्यासाठी गेले. यातच रात्री अज्ञात चोरट्यांनी दरवाज्याच्या जाळीच्या सहाय्याने दुसर्या मजल्यावर चढून मुस्तफा यांच्या खोलीत प्रवेश केला. समोर चार्जींगला ठेवलेले दोन मोबाईल व कपाटात ठेवलेल्या पँन्टमधून साडे आठ हजारांची रोकड चोरली. यानंतर खालच्या मजल्यावर सलीम बागवान हे झापलेले असतांना चोरट्यांनी त्यांच्या खोलीत प्रवेश करत त्यांचे दोन मोबाईल चोरले आणि शेवटच्या खोलीतील कपाट फोडले मात्र त्यात चोरट्यांना काहीही मिळून आले नाही. शेवटी चोरट्यांनी तिसर्या मजल्यावरील स्टोअर रूममधील कपाट फोडून पोबारा केला. सकाळी 6 वाजता सलीम बागवान यांना घरात चोरी झाल्याचे लक्षात येताच त्यांनी घराच्या सर्व खोल्यांची पाहणी केली. यात चोरट्यांनी कपाट फोडून सामान अस्ताव्यस्त फेकलेले सामान दिसून आले. तर घरातील चार मोबाईल व मुस्तफा यांचे साडे आठ हजार रुपये चोरीला गेल्याचे त्यांना दिसून आले. यानंतर त्यांनी पोलिसांना चोरी झाल्याबाबत माहिती दिली.
खिडकीतून मोबाईल लांबविले
अकबर मेहमुद बागवान यांच्या बांधकाम सुरू असलेल्या घरात चोरट्यांनी चोरी केल्यानंतर त्यांनी शेजारीच गुलशन बिल्डींग येथे राहणारे अक्ख्तर रफीक पटेल (वय-28) यांच्या घरात चोरी केली. सोमवारी रात्री अक्ख्तर हे घरात कुटूंबियांसोबत घरात झोपलेले होते. परंतू झोपण्याआधी त्यांनी घराच्या खिडकीत दोन मोबाईल चार्जिंगला लावले होते. चोरट्यांनी रात्री बागवान यांच्या घरी चोरी केल्यानंतर अक्ख्तर यांच्या घराकडे येवून खिडकीत ठेवलेले बारा हजार व सात हजार किंमतीचे असे दोन मोबाईल लंपास केले. सकाळी 6 वाजता जाग आल्यानंतर त्यांना खिडकीत चार्जिंगला लावलेले मोबाईल चोरीला गेल्याचे दिसून आले. यानंतर त्यांना बागवान यांच्या घरी देखील चोरी झाल्याचे समजले.
दार उघडे ठेवणे पडले महागात
चोरट्यांनी लागलीच आसिफ यांच्या घराच्या शंभर मिटर अंतरावर राहणारे युनूस खान युसूफ खान (वय-45) यांच्या घराकडे मोर्चा वळविला. युनुस खान हे ट्रॅव्हल्सबस वर ड्रायव्हर म्हणून कामाला आहेत. सोमवारी रात्री घरी आल्यानंतर त्यांनी त्यांचे मालकाला देण्यासाठी हिशोबाचे पैसे दोन पाकिटात ठेवलेले होते. यानंतर मोबाईल चार्जीगला लावले होते. रात्री झोपतांना गरम होत असल्याने त्यांनी घराचा अर्धा धरवाजा उघडा ठेवून कुटूंबियांसोबत झोपून गेले. हीच संधी साधत चोरट्यांनी त्यांच्या घरात प्रवेश केला. यानंतर समोरच ठेवलेले दोन्ही पाकिटातील 23 हजार पाचशे रूपये व दोन मोबाईल चोरून नेले. सकाळी 5 वाजता युनूस खान यांना अलार्म वाजली नसल्याने त्यांचा अचानक जाग आली. त्यांनी मोबाईल शोधला असता त्यांना मिळून आले नाही. यानंतर पाकिट पाहिल्यानंतर दोन्ही पाकिटातील पैसे चोरीला गेल्याचे दिसले. काही वेळातच शाहुनगर परिसरात तीन ठिकाणी चोरी झाल्याचे त्यांना कळाले.
कडी उघडून घरात चोरी
सोमवारी मध्यरात्री बागवान व पटेल यांच्या घरी चोरी केल्यानंतर चोरट्यांनी आपला मोर्चा शंभर मिटर अंतरावरच राहणारे शेख आसिफ शेख रफीक (वय-36) यांच्या घराकडे वळवला. आसिफ शेख हे घरात पत्नी व मुलांसोबत झोपलेले असतांना चोरट्यांनी त्यांच्या घराचा दरवाज्याची कडी उघडून घरात प्रवेश केला. यावेळी चोरट्यांनी आसिफ यांचे गाडी व्यावहारातील उशी खाली ठेवलेले पैसे लंपास केले आणि मोबाईलही चोरून नेला. सकाळी 5 वाजता आसिफ यांना जाग आल्यानंतर त्यांना उशी खालील पैसे व मोबाईल मिळून आले नाही. यानंतर त्यांना घरात चोरी झाल्याचे लक्षात आले. यानंतर त्यांनी शहर पोलिस ठाण्यात चोरी झाल्याची माहिती दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी येवून पाहणी केली.
लाखोंचा मुद्देमाल चोरी
शाहुनगरात चार ठिकाणी चोरी झाल्याची माहिती मिळताच शहर पोलिस ठाण्याचे डि.बी कर्मचारी गणेश शिरसाळे यांनी घटनास्थळी जावून पाहणी केली. मात्र, या घरफोड्यांबाबत जिल्हा पेठ व शहर पोलिस ठाण्यात कोणीही तक्रार दिली नसल्यामुळे घरफोडीबाबत कोणतीही नोंद नाही. दरम्यान, चोरट्यांनी या चारही ठिकाणाहून एकूण 9 मोबाईल व 61 हजार 700 रुपयांची रोकड लंपास केली. एकाच रात्री चार ठिकाणी घरफोड्या करत चोरट्यांनी दहशत माजवल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्याबरोबर शहरात आता पुन्हा घरफोड्यांच्या प्रमाणात वाढ होतांना दिसून येत असून यांना आळा कधी बसणार असा सवाल आता उपस्थित होत आहे.